Views


*कुटुंबापासून दुरावलेली 'ती' ‘चाईल्ड-लाईन’ उस्मानाबादच्या सतर्कतेमुळे पुन्हा आई-वडीलांच्या कुशीत!*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

कुटुंबीयांसोबत झालेल्या कुरबुरीमुळे रागाच्या भरात घर सोडले.. मजल-दरमजल भटकंती करत ती चक्क तुळजापूरपर्यंत पोहचली.. येथे रस्त्यावर बेवारस अवस्थेत फिरत असलेल्या चौदा वर्षीय मुलीला ‘चाईल्ड-लाईन’ उस्मानाबाद च्या सतर्कतेमुळे नळदुर्ग येथील ‘आपलं घर’ मध्ये आश्रय मिळाला. जोगेश्वरीची पावन भूमी अंबाजोगाईमधून नकळत कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या अंगणात आलेल्या या मुलीसाठी ‘चाईल्ड-लाईन’ ही जणू नवी ‘लाईफ-लाईन’ ठरली. देशभरात महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत आहेत. एकट्याने मुलींनी रस्त्यावर रात्री-अपरात्री फिरणे भीतीदायक ठरत असताना घरातून निघून आलेल्या या अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘चाईल्ड-लाईन’ची ही सतर्कता महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, तिची आस्थेवाईकपणे विचारपूस केल्यानंतर मिळालेल्या माहितीवरुन तिच्या आई-वडीलांचा शोध घेण्यात यश आले आणि ती पुन्हा आई-वडीलांच्या कुशीत विसावली आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील एका अत्यंत गरीब कुटुंबातील चौदा वर्षीय मुलीने घरामध्ये होत असलेल्या सततच्या वादामुळे नैराश्यातून घर सोडले. कारण काय होते तर आई रागावली म्हणून! अजाणत्या वयात तिने कोणते पाऊल उचलले आहे, हेही तिला ठाऊक नसेल. कारण तिचे वय पाहता जगात घडत असलेल्या हिंसा, मानवी अत्याचाराच्या घटनांपासून ती अनभिज्ञ होती. अंगावरील कपडेच तेवढे सोबत असलेली ही मुलगी कधी चालत, कधी कोणाला मदत मागत उस्मानाबाद जिल्ह्यात आल्यानंतर सुरुवातीला कळंब तालुक्यातील येरमाळा येथे गेली. तेथून तुळजापूर शहरात आली. इथेही तिचे कुणी नव्हते. इथे आल्यावर लोकांपुढे हात पसरुन तिने मिळालेल्या पैशातून पोटाची भूक भागवली. रात्रीच्या भयंकर थंडीत अंथरुण-पांघरुणाशिवाय तिने एक रात्र कशीबशी मंदिर परिसरातच घालवली. डोक्यावर निळे आभाळ आणि खाली थंड जमीन एवढाच तिला आधार होता. दुसरा दिवस उजाडला तरी तिच्यासमोर निश्चित म्हणता येईल असे ध्येय काहीच नव्हते. त्यामुळे तुळजाभवानी मंदिर परिसरात ती एकटीच रस्त्याच्या कडेला इकडून तिकडे फिरत होती. तिची शून्यातील नजर आणि रखडत पडणारी पावले अनेकांनी पाहिली, पण तिच्याकडे लक्ष देण्यास कोणाला वेळही नव्हता. तुळजापुरात आल्यानंतर अशा अवस्थेतच दुसर्‍या दिवसाची दुपारही टळून गेली. परंतु नियतीला देखील तिची दया आली असावी आणि तिची भेदरलेली अवस्था तुळजाभवानी मंदिर व परिसरात स्वच्छतेचे काम करत असलेल्या महिला सफाई कामगारांच्या नजरेस आली. नक्कीच ही मुलगी घरातून निघून आलेली असावी किंवा हरवलेली असावी असा संशय त्यांच्या मनात आला. दुपारी एका स्वच्छता कर्मचारी महिलेने तुळजापूर येथील पत्रकार तथा बाल सहाय्य पथकाचे अशासकीय सदस्य संजयकुमार बोंदर यांना फोन करुन मुलीबाबत कळविले. श्री.बोंदर यांनी तातडीने तुळजाभवानी मंदिर परिसराकडे धाव घेतली. तेथील स्वच्छता कर्मचारी महिलांनी मुलीचा शोध घेऊन श्री.बोंदर यांच्यासमोर आणले. तेव्हा बोंदर यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली. तिचे नाव, कोणत्या गावची, इथे कशी पोहचलीस याची विचारणा करुन तुला आई-वडिलांकडे जायचे नाही का? म्हटले असता तिने मी कुठेही काम करीन, घरकाम करीन पण आपणास घरी जायचे नाही, म्हणत रडू लागली. तिची ही केविलवाणी अवस्था पाहून तेथे उपस्थित असलेल्यांना मुलीची दया आली. परंतु तिच्याविषयी तिच्या कुटुंबियांविषयी कोणतीच ठोस माहिती समोर आलेली नसल्याने आणि कोणालाही तिचा ठावठिकाणा माहित नसल्यामुळे तिची कोणी मदतही करु शकत नव्हते. तिच्याकडून सविस्तर माहितीही मिळत नसल्यामुळे उस्मानाबादची ‘चाईल्ड-लाईन’च या मुलीची मदत करु शकेल, हे ओळखून श्री.बोंदर यांनी तातडीने उस्मानाबाद येथे ‘चाईल्ड-लाईन’ संस्थेच्या *'1098*' या टोल फ्री नंबरवर संपर्क साधला. तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात एक मुलगी आढळून आली असल्याची माहिती त्यांनी फोनवरुन दिली. माहिती मिळताच ‘चाईल्ड-लाईन’चे संचालक डॉ.दिग्गज दापके-देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार उस्मानाबाद येथून ‘चाईल्ड-लाईन’चे समन्वयक ज्ञानेश्वर गिरी, समुपदेशक वंदना कांबळे, टीम मेंबर अमर भोसले तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. तुळजापूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक तथा बाल कल्याण अधिकारी श्री.विकास दंडे यांनी महिला पोलीस कर्मचारी सोबतीला पाठवून मुलीची वैद्यकीय तपासणी करवून घेतली. त्यानंतर मुलीस ‘चाईल्ड-लाईन’च्या ताब्यात दिले. ‘चाईल्ड-लाईन’च्या पथकाने मुलीस उस्मानाबाद येथे घेऊन आल्यानंतर तिचे समुपदेशन करुन बाल कल्याण समितीसमोर हजर केले. बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ.ए.डी.कदम, सदस्य डॉ.कैलास मोरे, श्री.नंदकिशोर कोकणे, कॉ.आशा गोसावी यांनी सर्व शहानिशा करुन नळदुर्ग (ता.तुळजापूर) येथील ‘आपलं घर’मध्ये तिला दाखल करण्याचे आदेश दिले. बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार मुलीला नळदुर्ग येथील ‘आपलं घर’मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे एका अज्ञान जीवाने अजाणतेपणी उचलेले पाऊल तिच्या सुरक्षेच्या दृष्टीने किती घातक ठरू शकेल, याची पुसटशी कल्पनाही नसलेल्या या निराश्रीत मुलीला ‘चाईल्ड-लाईन’च्या सतर्कतेमुळे तात्पुरता आश्रय मिळाला. दरम्यान, मुलीस विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे तिच्या आई-वडीलांशी चाईल्ड-लाईनने संपर्क साधला. त्यांची मुलगी तुळजापुरात आल्याचे व सध्या ती सुरक्षित असल्याचा निरोप त्यांना कळविण्यात आला. दुसर्‍याच दिवशी मुलीला घेऊन जाण्यासाठी अंबाजोगाई येथून तातडीने दाखल झाले. सर्व खातरजमा केल्यानंतर मुलीस तिच्या आई-वडीलांकडे सुपुर्द करण्यात आले. ‘चाईल्ड-लाईन’ची सतर्कता आणि समयसुचकतेमुळे एक अजाण मुलगी तिच्या कुटुंबात परत गेली आहे. ‘चाईल्ड-लाईन’च्या या सेवाभावी कार्याचे ऋण व्यक्त करताना त्या माता-पित्यांचे डोळे पाणावले होते. 
आपणास कुठेही कुटुंबापासून दुरावलेले, हरवलेले, बेवारस अवस्थेतील अथवा समस्याग्रस्त बालक आढळून आल्यास तातडीने ‘चाईल्ड-लाईन’ उस्मानाबादशी *1098* या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. अशा बालकांना तातडीने मदत करुन कुटुंबीयांपर्यत पोहचविण्याचे, त्यांचे पुनवर्सन करण्याचे काम संचालक डॉ. दापके- देशमुख दिग्गज यांच्या मार्गदर्शनाखाली ‘चाईल्ड-लाईन’ उस्मानाबादच्या टीममार्फत केले जाते. *चाईल्ड-लाईन,उस्मानाबाद*
*टोल फ्री क्रमांक - 1098*
 
Top