Views


परंडा तालुक्यातील सीना कोळेगांव प्रकल्पातील पाणी अनाळा उपसासिंचन योजनेत सोडण्यात यावे भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील

 
उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

 परंडा तालुक्यातील सीना कोळेगांव प्रकल्पातील पाणी अनाळा उपसासिंचन योजनेत सोडण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील यांनी तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, परंडा तालुक्यात यावर्षी चांगल्या प्रकारे पाऊस पडल्याने सर्व मध्यम व लघु प्रकल्प पावसाने भरले आहेत. परंतु अनाळा परिसरात यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे अनाळा, इनगोंदा, कार्ला, मुगांव,भोंजा, कंडारी, सोनारी  परिसरातील लहान-मोठे तलाव ओढे-नदीनाले कोरडे ठाक आहेत. तरी अनाळा उपसासिंचन प्रकल्प गेल्या दोन ते तीन वर्षा पासुन कोरडा ठाक आहे. गेल्या वेळेस सीना कोळेगांव प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरल्यानंतर याठिकाणी असलेल्या पंपहाऊसच्या मोटारी व ईतर दुरुस्ती करुन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नाने तात्काळ निधी उपलब्ध केला व अनाळा उपसासिंचन योजना व सोनारी आणि कंडारी गावाकडे जाणारे कॅनॉल ला पाणी सोडुन तेथील दुष्काळी भागातील शेतक-यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला होता. सद्यस्थितीला सीना-कोळेगांव धरणात मोठ्या प्रमाणात जल साठा होत असुन धरणाची साठवण क्षमता पुर्ण झाल्यानंतर धरणातील खाली वाहुन जाणारे पाणी तात्काळ अनाळा उपसासिंचन योजनेमध्ये व सोनारी, कंडारी परिसरातील लघु व मध्यम तलावामध्ये सोडुन परिसरातील शेतक-यांना दिलासा द्यावा. या साठवण तलावामध्ये पाणी सोडल्यामुळे परिसरातील अनाळा, इनगोंदा, वाटेफळ, मलकापुर, रत्नापुर, कार्ला, मुगांव,भोंजा,सोनारी व कंडारी या कमी पर्जन्यमान झालेल्या गावांना शेती आणि पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचीही सोय होईल. त्यामुळे महोदयांना विनंती की, सीना - कोळेगांव धरणातील पाणी खाली वाहुन जाण्याअगोदर अनाळा उपसासिंचन योजनेत ते पाणी सोडुन शेतक-यांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. या निवेदनावर भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, उमाकांत गोरे, सरचिटणीस विठ्ठल तिपाले, निशीकांत क्षिरसागर, अरविंद रगडे, बिभीषण हांगे, कांतीलाल पाटील, शरद कोळी, साहेबराव पाडुळे, किरण देशमुख, अभय देशमुख, संदिप शेळके, सारंग घोगरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 
Top