Views


*राज्यातील शाळा महाविद्यालये सूरू करा. रिपब्लिकन सेना उस्मानाबाद ची मागणी*

कळंब:-(प्रतिनिधी)

              रिपब्लिकन सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले की कोवीड 19 च्या पार्श्वभूमीवर मागील सहा महिन्यापासून राज्यात लाॅकडाऊन मूळे  राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयेदेखील बंद ठेवण्यात आलेली आहेत. करोनाचा निपटारा करण्यासाठी राज्य सरकार, प्रशासन, आरोग्य विभाग व जनतेच्या संयुक्त प्रयत्नांना बऱ्यापैकी यश प्राप्त झालेले आहे. दरम्यान राज्य सरकारकडून अनलॉकची प्रक्रिया टप्प्या-टप्प्याने सुरुवात करण्यात आलेली आहे. व्यापार-उद्योग दळणवळण, खाजगी व शासकीय कार्यालयीन कामकाज सुरळीत होऊन पूर्वपदावर येत आहे. परंतु राज्यातील शाळा-महाविद्यालये अजूनही सुरुवात झालेली नाहीत. 
लॉकडाऊनच्या कालावधीत यूजीसी, राज्य सरकार, विद्यापीठे व शिक्षण मंडळे आदिंनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना व नियमांनुसार, ऑनलाइन शैक्षणिक कामकाज पार पाडण्याचा प्रयत्न, शैक्षणिक संस्थांमार्फत केला जात आहे. परंतु, मुंबई-पुण्यासारखा  थोडाफार शहरी भाग वगळता, राज्यात इतरत्र ऑनलाइन शैक्षणिक प्रणालीचा फज्जा उडालेला दिसतो. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होऊन, तो शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाबाहेर फेकल्या जाण्याची चिन्ह दिसत आहेत. एकीकडे ऑनलाइन अध्यापनाचा आग्रह, तर दुसरीकडे शैक्षणिक संस्थांमधील ऑनलाइन सुविधांची अनुपलब्धता व ग्रामीण विद्यार्थ्यांची असहाय्यता, आदि  कारणांमुळे ग्रामीण महाराष्ट्रात शिक्षक-प्राध्यापकांचे ऑनलाइन अध्यापनाचे प्रयत्न बऱ्याच अंशी विफल होताना दिसतात. अशा परिस्थितीत राज्यातील शैक्षणिक वर्तुळातून शाळा-महाविद्यालये सुरुवात करण्याची आग्रही मागणी समोर येत आहे. 
करिता, रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी मा.आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आदेशान्वये, रिपब्लिकन सेना जिल्हा कार्यकारिणीच्या  वतीने,मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना कळंब उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या दृष्टीने नियमांच्या अधिन राहून  राज्यातील शाळा-महाविद्यालये  रीतसर सुरू करण्यासंबंधी सदरील निवेदन देण्यात येते. 

निवेदनामध्ये अशा मागण्या आहेत:
 
01.राज्यातील शाळा-महाविद्यालये  त्वरित सुरुवात करण्यात यावीत.
02.लॉकडाऊनमुळे ज्या सत्राचे शैक्षणिक कामकाज झाले नाही,  त्या सत्राची सर्व प्रकारची फी विद्यार्थ्यांना माफ करण्यात यावी 
03.होऊ घातलेल्या सर्व परीक्षा ऑनलाईन न होता ऑफलाईन घेण्यात याव्यात. 
04.करोनाच्या प्रादुर्भावामुळे एखाद्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील कर्ता पुरुष दगावला असल्यास त्याच्या शैक्षणिक खर्चाची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी. 
05.करोनाच्या प्रादुर्भावामुळे एखादा विद्यार्थी, शिक्षक,  प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी दगावला असल्यास त्याच्या कुटुंबाला राज्य सरकारने भरीव आर्थिक मदत करावी. 
06.यापुढे करोना व तत्सम महामारी अथवा आपत्कालीन  संकटाला सामोरे जाण्यासाठी, राज्यातील विद्यापीठांच्या सहकार्याने, राज्य सरकारच्या वतीने सर्व शैक्षणिक संस्थामधून समुपदेशनपर व जनजागृतीविषयक कार्यक्रम  राबवण्यात यावा व त्यासाठी कायमस्वरूपी तथा स्वतंत्र प्राधिकरणाची तरतूद करण्यात यावी  अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येइल निवेदनावर रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल हजारे तालुका प्रमुख लाखन गायकवाड मराठवाडा नेते मुजीब पठाण सुरज वाघमारे सायस हजारे ढवारे दिपक प्रशांत हजारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत
 
Top