Views
*कोरोना कधी जाणार ? चाइल्डलाईनच्या हेल्पलाईकडे बालकांचा निरागस प्रश्न!* *लॉकडाऊन काळात चाइल्डलाईन करतंय बालकांचे समुपदेशन*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

कोरोना म्हणजे काय आहे ? कोरोनाला दूर पळविण्यासाठी घरातच का बसावे लागते ? हा कोरोना कधी जाणार ? असे अनेक ना अनेक निरागस प्रश्न बालक चाइल्डलाईनकडे विचारु लागले आहेत. या त्यांच्या या प्रश्नांना अचूक उत्तरे देऊन घरातच राहण्याविषयी जनजागृती करून बालमनावरील ताण हलका करणयचे काम चाइल्डलाईनच्या 1098 या हेल्पलाईनमार्फत केले जात आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये थैमान घातलेल्या कोरोना (कोविड-19) विषाणू संसर्गाने सर्वजण दहशतीखाली आहेत. या दहशतीचा प्रभाव बालमनावरही मोठ्या प्रमाणात होत आहे. चिमुकल्यांची खेळण्याबागडण्याची इच्छा दडपून मुले इतर छंद जोपासताना दिसत आहेत. परंतु काहीजणांमध्ये एकाकीपणाची भावना वाढीस लागल्यामुळे चिडचिडेपणा निर्माण होत असल्याच्या तक्रारीही पालकांमधून येत आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी चाईल्डलाईनमार्फत समुपदेशन सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी चाइल्डलाईनच्या 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या क्रमांकाबाबत जनजागृती केल्यानंतर चाइल्डलाईनची हेल्पलाईन खणखणू लागली आहे. निरागस मनाला पडलेल्या प्रश्नांची उकल व्हावी यासाठी त्यांचे योग्य प्रकारे समुपदेशन केले जात आहे. ही सुविधा 24 तास उपलब्ध असल्याची माहिती चाइल्डलाईनचे संचालक डॉ. दिग्गज दापके - देशमुख उस्मानाबाद यांनी दिली. 

*पालकांमधून समाधानकारक प्रतिक्रिया*
चाइल्डलाईनमार्फत 1098 या टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकाची माहिती देण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील शाळांमधून नियमित जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जातात. त्यामुळे 0 ते 18 वयोगटातील अनेक मुलांना 1098 हा क्रमांक अवगत झालेला आहे. याच क्रमांकावरून लॉकडाऊनच्या काळात मुलांचे समुपदेशन करण्याचा उपक्रम सुरू केल्याने पालकांनीही समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 

*समुपदेशनासाठी टीम मेंबर सज्ज*
बालमनाला पडलेले प्रश्न जाणून घेऊन त्यांचे योग्यरीत्या समुपदेशन करुन त्यांच्यामधील नैराश्य दूर करण्याचे काम चाइल्डलाईनची टीम अविरत कार्यरत आहे. चाइल्डलाईनचे संचालक डॉ. दिग्गज दापके-देशमुख, जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर गिरी, समुपदेशक दादासाहेब कोरके यांच्यासह विकास चव्हाण, रवि राऊत, बालाजी कानवटे, प्रशांत गायकवाड, दमयंती साबळे, सुजाता जाधव हे टीम मेंबर सज्ज आहेत.


 
Top