*दामाजीपंतांच्या भक्तांच्या मदतीला गोरोबाकाकांच्या भूमिपुत्राची धाव!* *सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये उपचार घेणारे मंगळवेढ्याचे तिघेजण कोरोनामुक्त*
लोहारा:-(इकबाल मुल्ला)
संत दामाजीपंतांच्या भक्तांच्या स्वास्थ्यासाठी संत गोरोबा काकांच्या पावन भूमीतील भूमिपुत्राने धाव घेऊन एकविसाव्या शतकातही संतांची परंपरा अबाधीत राखल्याचा प्रत्यय सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये आला. मंगळवेढ्यातील तिघेजण यशस्वी उपचारानंतर गणरायाच्या आगमनादिवशीच (दि.22) कोरोनामुक्त झाल्याची आनंदवार्ता मिळाली. तिघा कोरोनामुक्तांना हॉस्पिटल्सच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला.
मंगळवेढा येथील वारकरी कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण झाली होती. न्यूमोनियाने अधिकच त्रस्त होते. एकास श्वास घेण्यासही मोठा त्रास होत होता. दरम्यान, येथील सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाशी त्यांची ओळख असल्याने त्यांनी डॉ.दिग्गज दापके - देशमुख यांच्याशी संपर्क साधून परिस्थिती सांगितली. त्यानंतर 13 ऑगस्ट रोजी तत्काळ मंगळवेढा येथे रुग्णवाहिका पाठविण्यात आली. श्वसनाचा त्रास जाणवू लागलेल्या व्यक्तीची प्रकृती अत्यवस्थ असल्याने ऑक्सिजनचीही सोय रुग्णवाहिकेत करण्यात आली होती. तिघांनाही उस्मानाबाद येथे सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये दाखल केले. तिघांना कोरोना विषाणू संसर्ग झालेला असल्याने सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील कोविड सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू केले. येथे डॉ.दापके - देशमुख दिग्गज यांच्यासह डॉ. महादेव वाडेगावकर, डॉ.हर्शद पडवळ, इ. सहकार्यांनी रुग्णांची काळजी घेतली व योग्य उपचार झाल्यानंतर तिघेही कोरोनामुक्त झाले. त्यानंतर शनिवारी तिघांनाही हॉस्पिटल्समार्फत डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले.
तेर (उस्मानाबाद) आणि मंगळवेढ्याला संत परंपरेचा मोठा वारसा लाभलेला आहे. तेरचे संत गोरोबा काका आणि मंगळवेढ्याचे संत दामाजीपंत हे पांडुरंगाचे निस्सीम भक्त त्यांची मदत आणि सेवेची परंपरा एकविसाच्या शतकातही निरंतर सुरू असल्याची भावना तिघा कोरोनामुक्तांनी व्यक्त केली. संत परंपरेतील मंगळवेढ्याचे संत दामाजीपंतांच्या तिघा भक्तांच्या स्वास्थ्यासाठी संत गोरोबा काकांच्या पावन भूमीतील भूमिपुत्राने धाव घेऊन दिलेल्या या उल्लेखनीय सेवेची अनुभूती आलेल्या तिघा कोरोनामुक्तांनी सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्सच्या संपूर्ण टीमचे आभार व्यक्त केले.