Views
राजस्व अभियानातून महसुली प्रकरणे निकाली काढणार- जिल्हाधिकारी दिवेगावकर

लोहारा:-(इकबाल मुल्ला)

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये प्रलंबित असणारी महसुली प्रकरणे निकाली काढण्यासाठी राजस्व अभियान सुरू करणार असल्याची माहिती उस्मानाबाद जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. सध्या कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढतो आहे त्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना राबवले जाणार आहेत. ठाणे, गडचिरोली, जळगाव आणि लातूर जिल्ह्यातील यापूर्वीचा प्रशासकीय अनुभव पाहता उस्मानाबाद जिल्ह्यात हजारोच्या संख्येने महसुली प्रकरणे प्रलंबित आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या काय आहेत हे सोडवण्यासाठी आपण सर्वप्रथम प्राधान्य देणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला. उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, सचिव भीमाशंकर वाघमारे यांच्यासह पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक कमलाकर कुलकर्णी, महेश पोतदार, रवींद्र केसकर जी.बी राजपूत, देवदास पाठक, सयाजी शेळके बालाजी निरफळ, हुंकार बनसोडे, सुधीर पवार, आझर शेख, प्रवीण पवार, छायाचित्रकार कालिदास मेत्रे, आरिफ शेख यांच्यासह उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top