Views


कलदेव निंबाळा येथे आपत्कालीन पार्श्वभूमीवर रक्तदान शिबीर

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
कलदेव लिंबाळा ता.उमरगा येथील ग्रामपंचायतच्या वतीने सांस्कृतिक सभागृहात सरपंच सुनिता पावशेरे, पल्लवी डोणगावे, शामल नंदगावे यांच्यासह ५० रक्तदात्यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान केले. सध्या दवाखान्यात कोरोनाचे अनेक रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने अशा काळात जिल्ह्यात रक्ताची कमतरता भासत आहे. सामाजिक भावनेतून आपणही गावच्या वतीने रक्तदान करुन आजारी रुग्णांना मदत करावी असे आवाहन सरपंच सुनिता पावशेरे यांनी महिला, युवक व नागरिकांना केले होते. या अवाहनाला प्रतिसाद देत कलदेव निंबाळा गावातील युवकांनी अवघ्या दोन - तीन दिवसातच ग्रामपंचायतकडे नाव नोंदणी करत रक्तदान करुन कोरोनाच्या आपत्ती काळात छोट्याशा गावातून सामाजिक बांधिलकीचे भान राखत मदत केली आहे. गावात ग्रामपंचायतच्या वतीने रक्तदान शिबीर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सरपंचांच्या आवाहानामुळे व त्यांनीही यात सहभाग घेतल्याने आम्हालाही रक्तदान करुन रुग्णांना रक्ताची मदत करावे वाटल्याची भावना पल्लवी डोणगावे यांनी यावेळी व्यक्त केली. उमरगा येथील श्रीकृष्ण रक्तपेढी यांच्यामार्फत रक्त संकलन करण्यात आले. कलदेव निंबाळा गावचा आदर्श उपक्रम इतरही गावांनी घ्यावा व अशा कठीण प्रसंगी आपात्कालीन रक्तदान शिबीरे आयोजित करावीत असे आवाहन रक्तदान शिबिराप्रसंगी उपस्थित असलेले व साठ वेळा रक्तदान केलेले अंनिसचे राज्य समन्वयक तथा रक्तदानाचे प्रेरक प्रा.किरण सगर यांनी केले. यावेळी श्रीकृष्ण रक्त पेढीचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ.सागर पतंगे, प्रा.अभयकुमार हिरात, सचिन लोखंडे, गंगाधर हंचाटे, अविनाश राखेलकर, योगेश सोनकांबळे, बाळू पवार, धोंडीबा भोसले, रविंद्र गुंजाटे, ग्रामसेवक सुनिल पांचाळ, कलाकार पाटील, पांडूरंग पाटील, प्रभाकर बिराजदार, प्रियंका घंटे, आसावरी पावशेरे आदींसह रक्तदाते उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत परिसरात सरपंच सुनिता पावशेरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. रक्तदान यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा अंनिसचे जिल्हा पदाधिकारी देविदास पावशेरे यांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबिर यशस्वी केले.
 
Top