Views


*जन्म होताच आई म्हणाली ‘नको मला बाळ..!!*
 ('नकोशा' बाळाला डॉ. दापके- देशमुख दिग्गज यांनी मिळवून दिला आश्रय)

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
ती सज्ञान असली तरी कुमारी माता होती बाळंतपणासाठी 'ती' रुग्णालयात  दाखल झाली व नैसर्गिक प्रसूती झाली. गुटगुटीत बाळ जन्माला आले; परंतु ते जन्माला येताच चक्क आईच म्हणाली, ‘डॉक्टरसाहेब, मला नको ते बाळ... त्याचा सांभाळ मी कसा करू?...’ या बाळाचे नक्की काय करायचे असा प्रश्न भेडसावत होता.एका नातेवाईकांनी चाईल्ड- लाईन उस्मानाबाद या संस्थेच्या ' 1098' या टोल फ्री नंबरवर संपर्क साधला.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन चाईल्ड- लाईन चे संचालक डॉ. दापके- देशमुख दिग्गज यांनी नवजात बाळाच्या मदतीसाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. परिस्थितीपुढे माणूस अनेकदा पराभूत होतो, तसाच प्रसंग या मातेवर ओढवला असून, नऊ महिने पोटात सांभाळलेला हा मायेचा गोळा दुसऱ्याच्या स्वाधीन करण्याची वेळ तिच्यावर आली आहे.  बाळ-बाळंतिणीची तपासणी केल्यानंतर तिला डिस्चार्ज देण्याची प्रक्रिया सुरू झाली; परंतु तिने बाळाला स्वीकारण्यास नकार दिल्यावर बाळाची जबाबदारी घ्यायची कुणी असा प्रश्न तयार झाला.चाईल्ड- लाईन उस्मानाबाद ला कळविल्यानंतर कायदेशीर माहिती घेतली.उस्मानाबाद बाल कल्याण समिती समोर प्रकरण कायदेशीर सादर केली व शिशु सदन येथे बाळाची व्यवस्था केली. आईच्या संमती व स्वाक्षरीसह 'बाळ नको'अशी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण  करण्यात आली.दत्तक विधान कायद्यानुसार शासकीय स्तरावर प्रक्रिया राबवून बाळाचे पुनर्वसन होईल. या नवजात असहाय्य बालकाला न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. दापके- देशमुख दिग्गज यांच्या सह उस्मानाबाद बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. ए.डी.कदम,सदस्य डॉ. कैलास मोटे,अँड.आशा गोसावी, किशोर कोळगे तसेच चाईल्ड- लाईन चे समन्वयक ज्ञानेश्वर गिरी टिम मेंबर दादासाहेब कोरके,रविराज राऊत,विकास चव्हाण यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.

 
Top