Views


*जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

 *कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडून आढावा

उस्मानाबाद:-(प्रतिनिधी) 
      जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेऊन जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू दर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
      जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीची पाहणी केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अनुषंगाने विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी (1जुलै) आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ - मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलिस अधिक्षक राज तिलक रोशन, 
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राज गलांडे-पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांच्यासह महसूल, पोलीस व आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
     विभागीय आयुक्त केंद्रेकर पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी विविध उपाययोजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. विशेषत: कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू दर कशा पद्धतीने कमी करता येईल यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक सतर्क रहावे. याकरिता रुग्णालयातील भिषक व भूलरोग तज्ञ यांना त्यांनी सूचित केले. कोविड व नॉन कोविड
 रुग्णांना उत्कृष्ट आरोग्य सेवा तत्परतेनेेेे देण्याची सूचना ही त्यांनी केली.
    तत्पूर्वी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी उस्मानाबाद जिल्हयातील उस्मानाबाद व तुळजापूर येथील रुग्णांलय व कोवीड केअर सेंटरला 1 जुलै रोजी भेट देऊन उपचार व विविध सोईसुविधांचा पाहणी केली. तसेच जिल्हा रुग्णालयाची नविन इमारत येथे प्रत्यक्ष भेट देऊन कोवीड व नॉन कोवीड रुग्णांच्या सदंर्भात माहिती घेतली. 
      प्रारंभी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी जिल्हा प्रशासनामार्फत कोरोना प्रतिबंधासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. तसेच जिल्हा रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना प्रशासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी-सुविधांची माहिती दिली. तर पोलीस अधीक्षक तिलक यांनी लॉकडाउनच्या काळात व आजपर्यंत पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या कामांची माहिती दिली.
                  
 
Top