Views


श्रावण महिन्यात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांचे आवाहन* देवस्थानचे अर्चक, पुजारी यांना रुढी परंपरेनुसार धार्मिक विधी, पुजा करण्यास अटी व शर्तीच्या अधीन राहून परवानगी


लोहारा :-(इकबाल मुल्ला)

उस्मानाबाद जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना कोविड-19 या संसर्गजन्य विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण मोठया प्रमाणावर आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आगामी श्रावण महिन्यात विविध ठिकाणी देवस्थानच्या वतीने यात्रा, जत्रा, धार्मिक कार्यक्रम, इतर सभासंमेलने याचे आयोजन करण्याबाबत दि.29 जून 2020 रोजी आदेश काढून मनाई करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने श्रावण महिन्यात देवस्थानाच्या ठिकाणी भाविकांची व लोकांची मोठया प्रमाणात गर्दी होत असते परिणामी कोरोना कोविड-19 या रोगाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे देवस्थानचे विश्वस्त व आयोजकांनी  श्रावण महिन्यात होणाऱ्या यात्रा, जत्रा, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे. तसेच सॅनिटायझरचा वापर करुन, सामाजिक अंतर ठेवून व तोंडाला मास्क, स्वच्छ रुमाल बांधून देवस्थानचे अर्चक, पुजारी यांना रुढी परंपरेनुसार धार्मिक विधी, पुजा करण्यासाठी परवानगी असेल. या व्यतिरिक्त लग्न समारंभ व अंत्यविधीमध्ये 50 पेक्षा अधिक व्यक्ती निदर्शनास आल्यास आयोजकांवर कायदेशीर करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

 
Top