* उस्मानाबाद जिल्हातील उमरगा नगर पालिका क्षेत्रात 25 जुलै ते 1 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू*
उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)
उस्मानाबाद,(दि. 22) जिल्ह्यातील उमरगा नगर पालिका क्षेत्रात कोरोना विषाणू कोविड-19 या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे व त्यावर नियंत्रण आणण्याची कार्यवाही करणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी कोरोना कोविड-19 विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी उमरगा नगर पालिका क्षेत्रात संचारबंदी लागू करणे आवश्यक झाल्याची खात्री झाली आहे.
त्यामुळे जिल्हादंडाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3), साथरोग अधिनियम 1897 च्या कलम 2 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या सर्व संबंधित तरतुदी अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन संपूर्ण उमरगा नगर पालिका क्षेत्रात दिनांक 25 जुलै 2020 च्या 00.00 वाजेपासून ते 01 ऑगस्ट 2020 च्या मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.
या कालावधीत नागरिकांना अनावश्यकरित्या घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या कालावधीत कोरोना विषाणूचा (COVID-19) होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा नगर पालिका क्षेत्रातील खालील आस्थापना वगळून उर्वरित आस्थापना बंद राहतील.
फिरते दुध विक्रेते यांच्या मार्फत घरपोच दुध, दुध पाकीटांची विक्री, वितरण करता येईल, परंतु एका ठिकाणी उभे राहुन दुध विक्री करता येणार नाही. घरपोच दुध, दुध पाकिटे वाटपाच्या वेळी कोरोना विषाणू कोविड-19 च्या अनुषंगाने सामाजिक अंतराचे पालन करावे. तसेच घरपोच दुध विक्रीची वेळ सकाळी 7.00 ते दुपारी 12.00 पर्यंत राहील.
सर्व सरकारी व खाजगी रुग्णालये, दवाखाने व त्यांच्याशी संलग्न मेडीकल स्टोअर्स चालू राहतील.
जार, वॉटर सप्लायर्स यांनी पाणी जारव्दारे वाटप न करता ग्राहकांकडील उपलब्ध भांड्यामधे पाणी द्यावे आणि त्यावेळेस सामाजिक अंतराचे पालन करावे किंवा जार, वॉटर स्पलायर्स यांनी संपूर्ण जार ग्राहकास द्यावे व रिकामी जार परत न नेता त्याच जारमध्ये पुनर्भरणाची घरपोच सेवा द्यावी व सर्व जार, वॉटर सप्लायरस कर्मचारी यांना त्यांची ओळखपत्राआधारे परवानगी राहील.
घरगुती गॅस घरपोच सेवा देतांना गॅस कंपनीचा गणवेश परिधान करावा व त्यांचे गणवेश नसलेल्या कर्मचारी यांनी ओळखपत्र सोबत ठेवावे. वर्तमानपत्रे व माध्यमांविषयक सेवा चालू राहतील.
सर्व शासकीय कार्यालय व केंद्र शासनाचे सर्व विभागांची कार्यालये सुरु राहतील. या कार्यालयाचे, विभागांचे कर्मचारी कार्यालयीन ओळखपत्राव्दारे नगर पालिका क्षेत्रात प्रवास करु शकतील.
प्रमुख अपर जिल्हा न्यायालय व सत्र न्यायाधीश उमरगा येथील न्यायालयीन कामकाजास परवानगी राहील.उमरगा नगर पालिका क्षेत्रातील नागरिकांना इतर जिल्हयात व राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन पास मिळणार नाही. तथापि अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय कारण किंवा अंत्यविधीसाठी परवानगी देण्यात येईल. यासाठी नागरिकांनी www.covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर अर्ज करावा.
उमरगा नगर पालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांनी कोरोना विषाणूचे अनुषंगाने (ताप,सर्दी,खोकला,डोकेदुखी व श्वसनास त्रास इ.) लक्षणे आढळून आल्यास नजीकच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी.
विद्युत सेवा, मोबाईल व दूरसंचार सेवा पुरविणाऱ्या कंपन्या, आस्थापना व त्यांचे कर्मचारी वाहनांना ओळखपत्राआधारे परवानगी राहील.
अंत्यविधीसाठी शासनाचे आदेशात नमूद केल्यानुसार नियमाप्रमाणे परवानगी राहील.
पेट्रोल, डिझेल पंप फक्त अत्यावश्यक सेवा, मिडीया व वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहनांना व शासकीय वाहनांसाठीच सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत सुरु राहील. ओळखपत्राची पडताळणी करुनच पेट्रोल, डिझेल वितरित करण्यात यावे. पेट्रोल, डिझेल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेट्रोल, डिझेल पंप चालकांनी दिलेल्या ओळखपत्राअधारे परवानगी राहील.
प्रशासनाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही धार्मिक यात्रा, मेळावे, विविध प्रकारचे प्रदर्शने, आठवडी बाजार, जनावरांचे बाजार भरविणे इ. आयोजन करण्यास मनाई करण्यात येत आहे.
या आदेशाची कडक अमलबजावणी सर्व संबंधित यंत्रणांनी करावी. कुठल्याही व्यक्तीकडून या आदेशातील सूचनांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाईल, असे जिल्हादंडाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी आदेशात नमूद केले आहे.