Views


*विद्यार्थ्यानो यशाचा एक एक गड काबीज करा - प्रतिक गायकवाड* 

कळंब/प्रतिनिधी 


सध्या स्वतःचे स्वराज्य निर्माण करायचे असेल तर सध्या ढाल तलवारीची लढाई नसून पुस्तक आणि पेनाची आहे. त्याचा सदुपयोग करून तुम्ही दहावी, बारावी व विविध पदव्या संपादित करत स्वतःचे स्वराज्य निर्माण करा असे आवाहन प्रसिद्ध व्याख्याते प्रतिक गायकवाड यांनी केले. ते तालुक्यातील हसेगाव (के) येथील पद्मश्री शंकरबापू माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष प्रशांत घुटे, शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर पालकर, स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक विजय कोल्हे उपस्थित होते.
पुढे बोलताना गायकवाड म्हणाले की कोरोना काळापासून मुलांच्या हातात मोबाईल आला असुन काहीजण त्याचा सदुपयोग करत आहेत तर काहीजण दुरूपयोग करत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता बदलत आहे. यासाठी विद्यार्थी व पालक यांच्यात सुसंवाद असणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यानी स्पर्धा परीक्षांची तयारी याच वयापासून सुरू केली पाहिजे तरच आपल्याकडे आएस आयपीएस घडू शकतात. स्वतःची आवड ओळखूनच क्षेत्र निवडा यश हमखास मिळेल असा आशावाद त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी प्रमुख पाहुणे प्रशांत घुटे यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक परमेश्वर पालकर यांनी केले तर सुत्रसंचालन प्राची चंदनशिवे हिने केले तर आभार उज्ज्वला लंगडे हिने मानले. यावेळी विद्यार्थी व पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोल्हे दत्तात्रय, दराडे बाबासाहेब, हजारे आदित्य, कोरे संतोष आदिनी प्रयत्न केले.

 
Top