*धाराशिव जिल्हयासाठी अभिमानास्पद…!माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांना राष्ट्रपतींच्या हस्ते विधानपरिषदेतील “उत्कृष्ट भाषण” पुरस्कार प्रदान!*
धाराशिव/ प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषदेचे माजी आमदार श्री. सुजितसिंह ठाकूर यांना महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवी कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते विधानपरिषदेतील “उत्कृष्ट भाषण” पुरस्कार देण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सव सोहळा मंगळवारी (३सप्टेंबर) मुंबई येथे विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॅा.नीलमताई गो-हे व विधानसभा उपसभापती नरहरी झिरवळ उपस्थित होते. माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांना सन २०१८ -१९ करिता महाराष्ट्र विधानपरिषद “उत्कृष्ट भाषण” पुरस्कार देण्यात आला असून ठाकूर यांनी विधीमंडळात सुजितसिंह ठाकूर यांनी विधीमंडळात मराठवाड्याचा अनुशेष, मराठवाडा आणि धाराशिव जिल्ह्यात सततचा पडणारा दुष्काळ, अवर्षण स्थिती, पाणी टंचाई, मराठवाड्याच्या हक्काचे २३.६६ टीएमसी कृष्णा खो-यातील पाणी, शेतकरी कर्ज माफी, शेतकरी आत्महत्या, जलयुक्त शिवार, शेतीपंपाचा वीज प्रश्न, मराठवाड्याचे मागासलेपण, बेरोजगारी आणि राज्यातील इतर विभागाच्या तुलनेत दरडोई कमी असलेले उत्पन्न, उदरनिर्वाहासाठी होणारे स्थलांतर, आकांक्षीत धाराशिव जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, डॅा.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या धाराशिव उपकेंद्रास स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा द्यावा आदी तसेच राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचे अनेक विषय प्रभावीपणे सभागृहात मांडले होते. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांना “उत्कृष्ट भाषण” हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ठाकूर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. “राज्यभरातील माझ्यावर निखळ प्रेम करणारे सहकारी कार्यकर्ते आणि धाराशिव जिल्ह्यातील जनतेस हा पुरस्कार समर्पित असल्याचे यावेळी सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले.”