*1993 च्या प्रलयकारी भूकंपातील मृतांना सामुहिक श्रद्धांजली अर्पण*
धाराशिव/प्रतिनिधी
लोहारा - उमरगा - औसा येथील 1993 च्या प्रलयकारी भूकंपात मरण पावलेल्या मृत आत्म्यास 30 सप्टेंबर 2024 रोजी लोहारा तालुक्यातील सास्तूर चौरस्ता येथे सामुहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रथमतः उपस्थितांच्या वतीने स्मृती स्थंभास अभिवादन करून मान्यवरांच्या हस्ते गरजू व गरीबांना अन्नधान्य किट, साड्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शितलताई राहुल पाटील होत्या तर आमदार ज्ञानराज चौगुले व युवासेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात आमदार चौगुले यांनी सुरुवातीला भूकंपात मरण पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली. यावेळी आ. ज्ञानराज चौगुले बोलताना म्हणाले कि,
गेल्या अनेक वर्षापासून लोहारा-उमरगा भूकंपग्रस्त गावांना विशेष मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन व नागरी सुविधा पुरविण्याच्या अनुषंगाने असलेल्या महसूल व वन विभागाचा दि.14/10/2022 रोजीच्या शासन निर्णयात " भुंकप" या नैसर्गिक आपत्तीचा समावेश करुन भूकंप पुनर्वसित गावात अंतर्गत रस्ते, बंदिस्त गटारे व इतर मुलभूत नागरी सुविधा पुरविणे याबाबत शासन निर्णय झाला आहे. शासन निर्णयानुसार धाराशिव जिल्हाधिकारी यांना भूकंपग्रस्त गावांसाठी लागणाऱ्या निधीचा मागणी अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी 03 कोटी 89 लक्ष 15 हजार इतक्या रुपयांची मागणी महाराष्ट्र शासनाकडे सादर करून सदर कामास प्रशासकीय मान्यता देण्यासाठी नाहरकत दर्शविली असल्याची माहिती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उपस्थिताना दिली. कार्यक्रमस्थळी ह.भ.प.महेश महाराज माकणीकर, नहुश राहुल पाटील,
महम्मद बागवान, शिवसेना लोहारा तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, उमरगा तालुका प्रमुख बळीराम सुरवसे, अरुण जगताप, हरि भोसले पेठसांगवीकर, गुलाब मोरे, ज्येष्ठ शिवसैनिक मारुती जाधव, फझल कादरी, राजेंद्र माळी, बालाजी बनसोडे, गहिनीनाथ सुरवसे, पिंटू मुर्ट, यांच्यासह लोहारा उमरगा तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.