Views


*भूकंपग्रस्तांचे आरक्षण वाढवून 3% करण्यासह भूकंपग्रस्तांच्या विविध मागण्यासाठी आ.अभिमन्यु पवार यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट*

लोहारा/प्रतिनीधी

भूकंपग्रस्तांचे आरक्षण वाढवून 3% करण्यासह भूकंपग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी औशाचे आ. अभिमन्यु पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पाठपुरावा केला. 1993 च्या महाप्रलयकारी किल्लारी (ता.औसा) भूकंपात किल्लारी व आजूबाजूच्या गावांमधील जवळपास १० हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता तर हजारो जनावरे दगावली होती आणि हजारो घरं ध्वस्त झालेली. त्या महाप्रलयकारी भूकंपाचे ओरखडे मनावर घेऊनच लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील हजारो कुटुंबे जीवन व्यतीत करतात. तत्कालीन सरकारने किल्लारी भूकंपग्रस्तांना 3% आरक्षण दिले होते. पण २००९ साली तत्कालीन काँग्रेस सरकारने त्यात घट करून भूकंपग्रस्तांसाठी 2% आरक्षण केले. त्यात 2015 साली न्यायालयीन निर्णयाचा हवाला देऊन भूकंपग्रस्त आरक्षणात कोयना भूकंपग्रस्तांचा समावेश करण्यात आला. या दोन्ही बाबींचा विचार करून भूकंपग्रस्तांसाठीचे आरक्षण वाढवून 3% इतके करण्यात यावे, अशी आग्रही मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यासंदर्भात तपासून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधान सचिव, मदत व पुनर्वसन यांना दिल्या आहेत. विविध शासकीय नोकरभरतीतील भूकंपग्रस्तांची रिक्त पदे इतर प्रवर्गातून भरण्याची मुभा देणारा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने नोव्हेंबर 2016 मध्ये घेतला, यामुळे 'पात्र उमेदवार मिळाले नाहीत' अशी कारणे पुढे करून भूकंपग्रस्तांच्या आरक्षणावर सर्रासपणे अतिक्रमण केले जात असून सामान्य प्रशासन विभागाचा सदरील शासन निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी त्यांच्याकडे केली असता तपासून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग यांना दिल्या आहेत. शिक्षण सेवक भरतीतील भूकंपग्रस्त प्रवर्गातील रिक्त पदे भूकंपग्रस्त आरक्षणातच कायम ठेवत पात्र भूकंपग्रस्त D.Ed/B.Ed धारकांना सेवेत सामावून घेऊन सेवांतर्गत पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 3 अतिरिक्त संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात या माझ्या मागणीसंदर्भात सुद्धा तपासून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षण विभागाला दिल्या आहेत. यावेळी भूकंपग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष अमर बिराजदार, अभिलाष फावडे, व्यंकट जगताप, विष्णू काकडे उपस्थित होते.
 
Top