Views


*“विकास पत्रकारिता : शासन संवाद” कार्यशाळा*

*पत्रकारितेतील नवनवे बदल समजणे आवश्यक*
     *-जिल्हाधिकारी अशोक शिनगारे*
   
ठाणे :-


पत्रकारिता हे संवादाचे दुधारी माध्यम आहे, पत्रकारितेच्या माध्यमातून शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविल्या जातात. त्याचप्रमाणे जनतेच्या अडीअडचणी शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम देखील पत्रकारितेच्या माध्यमातून केले जाते. पत्रकारांनी अधिकाऱ्यांना अनौपचारिक पद्धतीने भेटून विकास विषयक संवाद साधणे आवश्यक आहे. पत्रकारितेतील नवनवे बदल समजून घेणे आवश्यक आहे, असे मत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज येथे व्यक्त केले.
     माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या विभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन व जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्हयातील पत्रकारांसाठी आज ठाणे महानगरपालिका, कै.नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे “विकास पत्रकारिता: शासन संवाद” या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. “विकास पत्रकारिता” या विषयावर राज्यातील ही पहिली कार्यशाळा आहे. 
         या कार्यशाळेस ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, कोंकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य संजय पितळे, कोंकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य मनोज जालनावाला, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, ठाणे जिल्हा आणि नवी मुंबईतील विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, ठाणे आणि नवी मुंबईच्या ग्रामीण आणि शहरी भागातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
      राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर, कै. नरेंद्र बल्लाळ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. 
     उद्घाटन प्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे म्हणाले की, 6 जानेवारी 1832 साली आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेला सुरूवात केली. पत्रकारितेत वेगवेगळे आयाम आहेत. ते सर्व आयाम प्रत्येक पत्रकारांनी अंगिकारले पाहिजेत.
       ठाणे शहर हे कला, क्रीडा, साहित्य आणि घटनेने दिलेल्या अधिकारांचा योग्य वापर करण्यात अग्रेसर आहे. आजच्या या कार्यशाळेच्या माध्यमातून पत्रकारांशी मनमोकळेपणाने संवाद साधण्याची संधी मिळाली, असे मत जिल्हाधिकारी शिनगारे यांनी व्यक्त केले. 
     ठाणे महानगरपालिका आयुक्त आभिजित बांगर म्हणाले की, शासन सेवेत पत्रकारांची महत्वाची भूमिका असते. शासनाने केलेल्या विकास कामांचा प्रतिसाद मिळविण्यासाठी पत्रकार हे खात्रीचे माध्यम आहेत. पत्रकारांचा प्रतिसाद हा नि:ष्पक्ष असतो. पत्रकारिता करताना त्या पत्रकारितेतून शहराच्या विकासासाठी काही योगदान मिळते की नाही याची जाणीव प्रत्येक पत्रकाराला असते. बातमी सकारात्मक किंवा नकारात्मक असल्यापेक्षा त्या बातमीची सत्यता जपणे महत्वाचे आहे. पत्रकारिता ही अशा पद्धतीची असावी ज्यातून सर्व क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधता आला पाहिजे. 
       कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकात कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे म्हणाले की, ‘विकास पत्रकारिता: शासन संवाद' ही कार्यशाळा या वर्षातील राज्यातील पहिली कार्यशाळा असून पत्रकारिता क्षेत्रात राज्यात, देशात काय सुरु आहे, हे जिल्ह्यातील पत्रकारांना कळावे, याकरिता ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ठाणे जिल्हयाला पत्रकारितेची मोठी पंरपरा लाभलेली आहे. अशा प्रकारच्या कार्यशाळा कोकण विभागात सर्व जिल्हयात करण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
       या कार्यशाळेत कोंकण विभागीय माहिती कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या “अधिस्वीकृती संदर्भ पुस्तिकेची पीडीएफ कॉपी व पत्रकारांना देण्यात येणाऱ्या विविध शासकीय लाभांच्या शासन निर्णयांची पीडीएफ” ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने व्हॉट्सॲपद्वारे पत्रकारांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पोस्ट करुन तसेच या कार्यशाळेस उपस्थित प्रमुख पाहुणे आणि वक्त्यांना भेट म्हणून संविधानाच्या अद्यावत प्रती देवून एक आगळा वेगळा उपक्रम माहिती खात्यामार्फत राबविण्यात आला. 
      सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. संजय तांबट यांनी “समकालीन माध्यम आणि विकास पत्रकारिता” या विषयावर तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचे माध्यम तज्ञ प्रा. श्रीकांत सोनावणे यांनी “डिजिटल युगात मुद्रित माध्यमांचे स्थान” या विषयावर मार्गदर्शन केले.
       या कार्यशाळेसाठी ठाणे महानगरपालिका माहिती व जनसंपर्क विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी, जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर, सहायक जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर व इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. सहायक संचालक संजीवनी जाधव यांनी वक्त्यांचा परिचय करुन दिला तर सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले. 

 
Top