Views


*उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कामावर दांडी?*

*कामचुकारांवर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक*

*सह उपप्रादेशिक अधिकारी नेरपगार येतात भर.... उशिरा!*


उस्मानाबाद /प्रतिनिधी 


जिल्ह्यासह देशाच्या विविध भागात खास दळणवळणासाठी तयार करण्यात आलेली वाहने रस्त्यावर चालण्यासाठी योग्य व सुस्थितीत आहेत किंवा नाही याची देखभाल करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून खास व्यवस्था करण्यात आलेली आहे. या कार्यालयात नियुक्त केलेल्या सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यासह इतर कर्मचारी कार्यालयामध्ये चक्क आकरा वाजल्यानंतरच हळू हळू येण्यास सुरुवात करतात. विशेष म्हणजे कार्यालयात उपस्थित राहण्याची वेळ सकाळी साडेनऊ तर कार्यालयातून घरी जाण्याची वेळ‌ सायंकाळी साडेसहा वाजता करण्यात आलेली आहे. मात्र कार्यालय प्रमुख असलेले गजानन नेरपगार हेच...भर..उशिरा येत असल्याचे एका स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले आहे. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील अधिकारी - ‌कर्मचारी यांना एक न्याय तर इतर कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना दुसरा न्याय अशी विषम मात्र चिड आणणारी परिस्थिती निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे सर्वच अधिकारी-कर्मचारी ‌पाच दिवसांचा आठवडा करावा यासाठी शासनाकडे वारंवार मागणी करीत होते. शासनाने त्या मागणीनुसार राज्य सरकारने कर्मचाऱ्यांवर शासकीय कामांचा अतिरिक्त ताण होऊ नये यासाठी चक्क पाच दिवसांचा आठवडा केला आहे. मात्र या पाच दिवसांमध्ये सकाळी साडेनऊ वाजता कार्यालयात‌ हजर होऊन सायंकाळी पावणे सात वाजता दिवसभराचे सर्व कामकाज आटोपून घरी जावे अशी महत्त्वपूर्ण अट व बंधनकारक टाकले आहे. त्यानुसार दिलेल्या वेळेचे बंधन पाळने गरजेचे आहे. मात्र खुद्द कार्यालय प्रमुख असलेले सह उपप्रादेशिक अधिकारी यांच्यासह आस्थापनांवरील इतर अधिकारी व कर्मचारी हे शासनाने निर्धारित केलेल्या वेळेमध्ये कर्तव्यावर का जात नाहीत ? त्यामुळे अशा कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांची वरिष्ठ स्तरावरून झाडाझडती घेणे आवश्यक ठरणार आहे. 
या कार्यालयात ४१ कर्मचारी कर्तव्यावर आहेत. हे कर्मचारी दररोजच उशिरा येऊन दौऱ्याच्या नावाखाली दांडी मारीत असल्याचे समजते.
 महत्त्वाचे म्हणजे या कार्यालयात जिल्हाभरातील नागरिक खेड्यापाड्यातून सकाळपासूनच या कार्यालयामध्ये येऊन बसतात. मात्र संबंधित टेबलचे अधिकारी दौऱ्यावर गेलेत अजून आले नाहीत अशी थातूर-मातूर र व उडवा-उडवीची कारणे त्यांना सांगितली जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे संबंधित नागरिकांना सकाळच्या सत्रातच नकारार्थी उत्तर मिळाल्यामुळे ते नैराश्याने आल्या पावली आपल्या गावाकडे निघून जातात. कारण त्यांना अधिकारी नाहीत हे विचारणे देखील दुरापास्त व अवघड होऊन बसलेले असते. या जागीरदारी डौलात येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना वेळेचे भान नसल्यामुळे व वरिष्ठ अधिकारीच दम दौलत येत असल्यामुळे कर्मचारी देखील बिनधास्तपणे उशिराने कार्यालयात येणे पसंत करतात. विशेष म्हणजे आल्यानंतर देखील ते तात्काळ आपल्या हातावरील कामे निपटारा करण्याऐवजी चहा, पाणी व पिचकाऱ्यांचे फवारे उडविण्यामध्ये धन्यवाद आहेत. अशा मुजोर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरकांमधून होत आहे.

 
Top