*सुरक्षिततेची भावना जनतेत रुजण्यासाठी पत्रकारांचे योगदान महत्वपूर्ण आहे, अशा शब्दांत पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी कौतुक केले.*
उस्मानाबाद/प्रतिनिधी
समाजातील भल्या बुर्या बाबींवर परखड भाष्य करुन त्याच्या नायनाटासाठी पाठपुरावा करणारी आजची पत्रकारिता म्हणजे कम्युनिटी पोलिसींगच आहे. सुरक्षिततेची भावना जनतेत रुजण्यासाठी पत्रकारांचे योगदान महत्वपूर्ण आहे, अशा शब्दांत पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी कौतुक केले.
उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकारांच्या गौरवसोहळ्यात ते बोलत होते. दर्पणदिनानिमित्त शुक्रवारी (दि. 6) शासकीय विश्रामगृहात हा कार्यक्रम झाला. त्या वेळी ते बोलत होते.
अधीक्षक कुलकर्णी म्हणाले, की समाजात शांतता टिकून राहावी यासाठी उस्मानाबाद पत्रकार संघाकडून राबविलेले गेलेले उपक्रम म्हणजे कम्युनिटी पोलिसींग आहे. जनता व पोलिस यांच्यातील संवाद साधणारा, या दोन्ही घटकांना एकत्र आणणारा दुवा म्हणजे पत्रकार आहेत. उस्मानाबादेत पत्रकारितेचे सकारात्मक दर्शन घडते. पोलिसांनीही आता सायबर क्राईम रोखण्याच्या दृष्टीने जनजागृती केली आहे. सुरक्षित समाजासाठी पत्रकार व पोलिसांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.