*महापुरुषांचे विचार अंगिकारल्यास जीवन समृध्द होते - प्रा. डॉ. यशपाल खेडकर*
कळंब/प्रतिनिधी
प्रत्येक माणूस सुखी जीवन जगण्यासाठी धडपड करत असतो, परंतु त्या बरोबरच आत्महत्येचा विचार ही मनात आणू नका, कारण हे आयुष्य सुंदर आहे. त्याचा उपभोग घ्या, मनावरील ताण हलका करायचा झाल्यास विविध कलेचा आस्वाद घ्या असे मत प्रसिद्ध व्याख्याते प्रा.डॉ. यशपाल खेडकर यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी आणि शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शि.म. ज्ञानदेव मोहेकर स्मृती व्याख्यानमालेचे हे (२०२२-२३) अकरावे वर्ष त्यातील पहिले पुष्प 'हे जीवन सुंदर आहे' या विषयावर प्रा. डॉ. यशपाल खेडेकर यांनी गुंफले,
यावेळी व्यासपीठावर ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, प्राचार्य डॉ. सुनिल पवार , रोटरीचे अध्यक्ष डॉ. सचिन पवार, सचिव डॉ.अभिजित जाधवर उपस्थित होते.
सध्या सगळीकडेच स्पर्धा दिसत आहे, अशा युगात ज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. दुष्काळी परिस्थिती आहे. प्रत्येकालाच जगणे नकोसे झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक महापुरुषांनी त्यांचे जीवन प्रचंड संघर्षातून सुंदर बनविले, त्याचा उपभोग घ्या, मनावरील ताण हलका करण्याचा विचार करून आपण आपलेही जीवन सुंदर बनवा, मन प्रसन्न रहावे, यासाठी वेगवेगळ्या विषयावर चिंतन, वाचन केले पाहिजे. असा अनमोल संदेश त्यांनी दिला आहे. डॉ.यशपाल खेडेकर यांनी अनेक विविध उदाहरणांच्या माध्यमातून जीवन कसे सुंदर आहे, हे पटवून दिले .त्यांनी जीवनात माणसानेच माणसाला पूजले पाहिजे, हे जीवन सुंदर जगण्यासाठी एकमेकाला आधार दिला पाहिजे. हे जीवन जगण्यासाठी आहे, कलेचा आस्वाद घेण्यासाठी आहे. हसत-खेळत सुंदर जीवन जगले पाहिजे.
व्याख्यानमालेचे आभार श्री अरविंद शिंदे यांनी मानले तर सूत्रसंचलन प्रा. डॉ. व्ही एस अनिगुंठे, प्राचार्य डॉ. सुनिल पवार यांनी करुन राष्ट्र गिताने सांगता करण्यात आली. सदर व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य डॉ.हेमंत भगवान, प्रा.पंडित पवार, प्रा.डॉ.दादाराव गुंडरे, प्रा. डॉ. कमलाकर जाधव, प्रा. डॉ. दीपक सूर्यवंशी, श्री हनुमंत जाधव, श्री अर्जुन वाघमारे, श्री संतोष मोरे, श्री अरुण मुंडे, श्री विनोद खरात, श्री संदिप सूर्यवंशी, श्री चांगदेव खंदारे आदींनी परिश्रम घेतले.