Views




*सततच्या पावसामध्ये बीबीएफ व टोकण पद्धतीची पेरणी ठरतेय पिकांसाठी फायदेशीर*



लोहारा/प्रतिनिधी


नीती आयोगाच्या अकांशित जिल्हा कार्यक्रमांतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बीबीएफ तंत्रज्ञानाचा प्रचार, प्रसिद्धी व वाटप करण्यात आले. या पद्धतीमुळे चांगली मशागत होऊन बियाण्यांसाठी चांगले वरंबे तयार होतात. मूलस्थानी जलसंवर्धन हा उद्देश ठेवून बीबीएफ पद्धतीने पेरणीमुळे बरेचसे फायदे शेतकरी वर्गामध्ये झाल्याचे दिसून येत आहेत. प्रामुख्याने बियाण्यामध्ये बचत, अंतर मशागत करण्यासाठी सोयीस्कर व त्याचबरोबर बियाणांची उगवण क्षमता चांगली होऊन पिकाची वाढ जोमदार होते. भारत हा कृषिप्रधान देश आहे शेतीव्यवस्थेला प्रगतशील करण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब शेतामध्ये करण्यात आले त्यातीलच एक महत्त्वाची पद्धत म्हणजे बीबीएफ पद्धतीने पेरणी. निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ याचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे व त्याचाच विपरीत परिणाम हा पिकावर होत आहे. 

अशा लहरीपणाच्या पावसापासून पिकांना संरक्षण भेटण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा अवलंब खूप फायदेशीर ठरत आहे. कमी पावसाच्या कालावधीत बीबीएफ या पद्धतीने तयार होणाऱ्या गादीवाफेमध्ये पाण्याची निचरा होते व आवर्षणामध्ये पिकांना संजीवनी ठरत आहे व त्याचबरोबर अधिकच्या पावसामुळे जास्तीचे होणारे पाणी हे सरीवाटे निघून जाते त्यामुळे पिकांना अतिवृष्टीच्या काळामध्ये जीवनदान भेटत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालूक्यातील अचलेर या गावी कृषी कार्यालय लोहारा यांच्या माध्यमातून बीबीएफ तंत्रज्ञानाच्या प्रसार व प्रसिद्धीसाठी सहकार्य केले जात आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये बीबीएफ तंत्रज्ञानाच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले होते त्याचेच फलित म्हणून खरीप हंगामामध्ये सुमारे 500 एकर पेक्षाही जास्त क्षेत्रावर बीबीफ यंत्राने सोयाबीन, उडीद व मूग या पिकांची पेरणी झाली आहे. येत्या दोन वर्षांमध्ये शंभर टक्के पेरणी हे बीबीएफ यंत्राच्या साहाय्याने करण्याचा निर्धार अचलेर येथील शेतकऱ्यांनी केलेला आहे. अचलेर येथील प्रगतशील शेतकरी सुनील मदने, तुळशीराम सोलंकर, गणपती घोडके, सिद्धू गोपने व मेघराज माने यांनी यावर्षी सुमारे पाचशे एकर पेक्षा जास्त पेरणी बीबीएफ पद्धतीने केली आहे व त्याचबरोबर या पद्धतीने पेरणीचे फायदे शेतकऱ्यांना पटवून देत आहेत. बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करण्यासाठी ट्रॅक्टर चालकांची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे म्हणून त्यांनी एक युवक पेरणीसाठी तयार केलेला आहे व वेळोवेळी इतर चालकांना प्रशिक्षण देत आहेत. अचलेर परिसरामध्ये सुनील मदने यांची ओळख बीबीएफ मॅन म्हणून होत आहे. 

बीबीएफ तंत्रज्ञानाचे फायदे 


१) प्रति एकरी १८-२० किलो बियाणे लागतात.
२) दोन ओळीतील व रोपातील अंतर योग्य ठेवता येते. (४५x१५ सेमी)
३) अतिवृष्टी व आवर्षणामध्ये पिकाचे नुकसान होत नाही.
४) अंतर मशागत करण्यास सोपे जाते.
५) यंत्राच्यासहाय्याने खते, बियाणे व त्याचबरोबर वखरणी हे सर्व कामे एकाच वेळेस करता येतात.
६) पारंपारिक पद्धतीच्या पेरणीपेक्षा तीस ते चाळीस टक्के खर्चाची बचत.


*यंत्र खरेदी करताना घ्यावयाची काळजी*

१) शासनाने नेमून दिलेल्या अधिकृत विक्रेत्याकडूनच यंत्राचे चाचणी अहवाल पाहून यंत्र खरेदी करावी.
२) यंत्राची जोडणी कशा पद्धतीने करावी हे यंत्र विक्रेत्याकडून किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून समजून घ्यावे.
३) पेरणी करण्यापूर्वी खते व बियाण्यांची मात्रा योग्य प्रमाणात पडत आहेत किंवा नाही याची खात्री करून घ्यावी.
४) ज्या ट्रॅक्टरला पेरणी यंत्र जोडणार आहात त्या ट्रॅक्टरची अश्वशक्ती विचारात घेऊनच यंत्राची खरेदी करावी.
५) बियाणे नियंत्रण व खत नियंत्रण पट्टीची योग्य निवड करावी.
६) दोन फण्यांमधील अंतर तपासून पहावे.


*बीबीएफ पद्धतीने पेरल्यानंतर शेतकऱ्यांचे अनुभव*


गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये 70 मिलिमीटर पेक्षाही जास्त पाऊस झाला परंतु बीबीएफ यंत्राने पेरणी केल्यामुळे माझ्या पिकाचे जास्त नुकसान झाले नाही.......सुनील मदने व तुळशीराम सोलंकर.
कमी खर्चामध्ये भरघोस उत्पादन घेण्यासाठी व निसर्गाच्या प्रकोपापासून पिकांना संरक्षण देण्यासाठी शेतकऱ्यांनी बीबीएफ व टोकन पद्धतीचा अवलंब करावा......

चिदानंद स्वामी 
कृषी सहाय्यक अचलेर 


सध्या मागील काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने पिके पिवळी पडत आहेत परंतु ज्या शेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा किंवा टोकन पद्धतीने पिकांची पेरणी केली आहे अशी पिके अद्यापपर्यंत चांगल्या स्थितीत तग धरून आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी अतिवृष्टी किंवा अवर्षण पासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी बी बी एफ अथवा टोकन पध्दतीने पेरणी करणे अत्यावश्यक आहे

मिलिंद बिडबाग, 
तालुका कृषी अधिकारी लोहारा


 
Top