*मलकापुर येथील एकनाथ महाराज लोमटे विरुध्द दर्शनासाठी आलेल्या महिलचे विनयभंग केल्याचे गुन्हा दाखल*
कळंब/प्रतिनिधी
तालुक्यातील मलकापूर येथील स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराज यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेला ब्लॅकमेल करून विनयभंग केल्याप्रकरणी लोमटे महाराजांच्या विरोधात येरमाळा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
बीड जिल्ह्यातील शिष्य असलेल्या पीडित महिलेने याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर अध्यात्मिक क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसात गुन्हा दाखल होताच लोमटे महाराज फरार झाला आहे. ही वार्ता पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली आणि भक्तांनी महाराजांच्या मलकापूर येथे मठामध्ये मोठी गर्दी करायला सुरुवात केली आहे .या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे .
अशी घडली घटना
कळंब तालुक्यामध्ये मलकापूर इथं श्री शेत्र दत्त मंदिर हे प्रसिद्ध देवस्थान आहे. एकनाथ लोमटे महाराज या देवस्थानचे मठापती आहेत. चमत्कारी बाबा म्हणून लोमटे महाराजांची ख्याती आहे. ज्यांना मुलं बाळ होत नाही किंवा आजार बरा होत नाही असे राज्यातील अनेक जण महाराजांच्या दर्शनासाठी येतात.
मंत्र उपचार आणि प्रसाद दिल्याने मनातील मनोकामना पूर्ण होते अशी महाराजांची ख्याती आहे. बीड जिल्ह्यातील एक महिला नियमित महाराजांच्या दर्शनासाठी येत होती. त्याप्रमाणेच गुरुवारी 28 जुलै रोजी ती महाराजांच्या दर्शनासाठी मलकापूर येथील मठामध्ये आली दर्शन घेऊन ही महिला परिसरातील एका झाडाखाली बसली होती.
त्यावेळी महाराजांच्या एका शिष्याने त्या महिलेला महाराज दर्शनासाठी बोलावतात असं सांगितलं आणि एका खोलीमध्ये घेऊन गेला. त्या खोलीत महाराज एकटेच बसले होते. महाराजांनी त्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. महिलेने विरोध करताच महाराजांनी तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. गेल्या वेळी दर्शनासाठी आलेली असताना प्रसादाचा पेढा दिल्यानंतर बेशुद्ध झाली आणि त्यानंतर मी तुझ्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. याचा व्हिडिओ आमच्याकडे आहे असं सांगत महाराज त्या महिलेला ब्लॅकमेल करू लागला.
महिला तरीही राजी होत नाही हे लक्षात येताच महाराजांनी त्या महिलेचा विनयभंग केला .आरडा, ओरड करून ती महिला कशीबशी त्या महाराजांच्या तावडीतून निसटली आणि पोलिसात जाऊन तक्रार दिली असे या महिलेने दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे .
राजकीय नेत्यांचे गुरु
एकनाथ लोमटे महाराज हे स्वतःला राष्ट्रसंत म्हणून घेतात. राज्यभर त्यांचं मोठं प्रस्त आहे. राज्यातील अनेक भागातील लोक महाराजांना गुरु करून घेण्यासाठी मलकापूरला येतात. विशेष म्हणजे एकनाथ लोमटे महाराज हे राजकीय पुढार्यांचे गुरु म्हणून प्रसिद्ध आहेत. राज्यातील बहुतांश महत्त्वाच्या राजकीय पुढाऱ्यांनी लोमटे महाराज यांना गुरु करून घेतलं आहे.
त्यांच्या दर्शनासाठी पुढार्यांची या मठामध्ये सारखं ये जा असते .महाराजांचाही सर्व पक्षातील पुढार्यांच्या बरोबर उठबस आहे. हे पुढारी महाराजांना आर्थिक मदत देखील करतात किंवा वेगवेगळ्या संकटाला धावून येतात. त्यामुळे महाराजांची मग्रुरी वाढत चालली असल्याचे अनेक गावकऱ्यांचे म्हणणं आहे.
यापूर्वीही गुन्हा दाखल
चमत्कारिक बाबा म्हणून लोमटे महाराज प्रसिद्ध आहेत गंडादोरे, प्रसाद आणि आशीर्वाद घेण्यासाठी भाविक त्यांच्याकडे मोठ्या श्रद्धेने येतात. महाराजांनी आशीर्वाद आणि प्रसाद दिला की मनोकामना पूर्ण होते अशी भक्तांची धारणा आहे. 2008 साली येरमाळा पोलीस ठाण्यात भोंदूगिरी केल्याप्रकरणी लोमटे महाराज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. आपली फसवणूक झाल्याच्या तक्रारी अनेक भक्तांनी केल्या होत्या त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला होता. असं असलं तरी महाराजांची ख्याती मात्र थोडीही कमी झाली नाही .
अटकेसाठी पोलिसांचे पथक रवाना
पीडित महिलेने विनयभंगाची तक्रार दिल्यानंतर पोलिस तात्काळ महाराजांचे मलकापूर या मठात गेले. मात्र महाराज फरार झाल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं .पोलिसांनी त्या ठिकाणच्या भक्तांना आणि मठातील शिष्य यांना महाराजाविषयी विचारपूस केली. मात्र महाराजाविषयी कोणीच काही सांगायला तयार नाहीत . महाराजांच्या अटकेसाठी पोलिसांनी एक पथक तयार केला असून ते रवाना झाले आहे व लवकरच महाराजांना अटक होईल असे पोलीस उपनिरीक्षक पुजारवाड यांनी सांगितले आहे.