Views




*ग्रामीण भागातही योगसाधना शिकण्याची ऊर्जा
कळंब, भूम तालुक्यात शासनाकडून प्रशिक्षण*


कळंब/प्रतिनिधी


तणावमुक्त आणि निरोगी राहण्यासाठी शहरी भागात योग प्रशिक्षण वर्ग आहेत. पण, आता निमशहरी आणि ग्रामीण भागातही योगसाधना करण्याबाबत जनजागृती वाढली आहे. कळंब, भूम भागात योग प्रशिक्षणाद्वारे गावकऱ्यांनी आरोग्यात सुधारणा झाल्याचे अनुभव घेतले आहेत. 
व्यग्र दिनक्रम, धावपळ, ताणतणाव फक्त शहरी भागापुरता मर्यादित राहिला नसून शांत जीवन जगणाऱ्या ग्रामीण भागातही शारिरीक आणि मानसिक तणावांनी डोके वर काढले आहे. वेगवेगळे उपचार करुन या तणावामुक्त मुक्त राहण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करीत आहे. मात्र, निकोप जीवनशैलीसाठी व्यायाम आणि ध्यानधारणा आवश्यक आहे. या गरजेतून योग विद्येचा पुन्हा विचार रूढ झाला आहे. शहरात योग शिकवणाऱ्या वर्गांची संख्या वाढली आहे. सोबतच ग्रामीण भागातही योग शिकण्याला महत्त्व दिले जात आहे. निमशहरी तालुका स्तरावही दररोज सकाळी, सायंकाळी योग वर्ग भरत आहेत. केवळ आरोग्याच्या विविध समस्यांमुळे ही जनजागृती वाढीस लागली आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. कळंब, भूम तालुक्यातील खेडेगावात योग वर्ग घेतलेले योग प्रशिक्षक आशिष झाडके यांचा अनुभव अगदी वेगळा आहे. ‘करोना काळात जिल्हा परिषदेच्या तालुका आरोग्य केंद्राअंतर्गत ग्रामीण भागात योग प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. दुर्गम गावात दररोज सकाळी सात ते दहा या वेळेत ग्रामस्थांना योग शिकवण्यात आले. या वर्गाला सुरुवातीला २० ते ३० लोक उपस्थित असत. ही संख्या हळूहळू वाढत गेली आणि योग केल्यामुळे झालेला बदल गावकरी सांगत असत’, असे आशिष म्हणाले. येरमाळा, जामगाव, अंबाजोगाई, भूम, लातूर, बीड या भागातील व्यसनमुक्ती केंद्रातही आशिष योग शिकवतात. व्यसनमुक्तीसाठी योग उत्तम उपाय आहे, असे त्यांनी सांगितले.    
योगसाधना करताना आसन, प्राणायाम, मुद्रा आणि ध्यान महत्वाचे आहे. योग करणे म्हणजेच जीवन जगण्याची कला आत्मसात करण्यासारखे आहे, असा अनुभव योगसाधक सांगतात. योगासने केल्यामुळे शारीरिक व्याधी दूर होतात. मानसिकदृष्ट्या खंबीर आणि पारदर्शक ठेवण्यासाठी योग उपयोगी आहे. दररोजच्या जगण्यातील तणाव कमी करण्यास हातभार लागतो. योग ही प्राचीन भारतीय संस्कृतीने दिलेली ध्यानधारणेची पद्धती आहे. मन आणि शरीर नियंत्रित ठेवण्यासाठी योग अनेकांना वरदान ठरले आहे. शारीरिक, मानसिक, सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी ग्रामीण भागातही योगाची गरज असल्याचे अभ्यासकांना वाटते. बलवान पिढी घडविण्यासाठी योग आवश्यक आहे. बळकट स्नायू, पचनसंस्था सुधारणे, आजारांवर उपाय, मानसिक सामर्थ्य देणे, कामातील एकाग्रता वाढवणे, भावनिक नियंत्रण, नैराश्यावर मात करण्यासाठी योग उपयुक्त ठरत आहेत. करोना काळात राज्य शासनाने राबविलेल्या वर्गांमुळे ग्रामीण भागात अनेकांना मानसिक आधार मिळाला आहे. 
---
योगासने करण्याचे वेगवेगळे फायदे आहेत. योग्य पद्धतीने आणि पुरेसा वेळ देऊन योग करणे आवश्यक आहे. निरोगी जीवनशैलीसाठी योगासारखे सोपे आणि उपयुक्त साधन नाही. योगसाधना मनुष्यास निरोगी ठेवून त्याला समाधानी जीवनशैली बहाल करते. 


आशिष झाडके, योग प्रशिक्षक कळंब.MA YOGA.
 
Top