Views


*क्रीडा प्रबोधिनीतील प्रवेशासाठीअर्ज करण्याचे खेळाडुंना आवाहन*
       
    
उस्मानाबाद/ प्रतिनिधी

राज्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ सेवा प्रवेश आणि खेळनिहाय कौशल्य प्रवेशाकरिता विभागस्तर आणि राज्यस्तरावर चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पात्र खेळाडुंनी सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज दि. 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सारिका काळे यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याकरिता प्रतिभावंत खेळाडुंची निवड करून शास्त्रोक्त प्रशिक्षण, अद्ययावत क्रीडा सुविधा, शिक्षण, भोजन, निवास आदी सुविधा क्रीडा प्रबोधिनीच्या अंतर्गत खेळाडुंना देण्यात येत आहेत.
 राज्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ सेवा प्रवेश आणि खेळनिहाय कौशल्य चाचण्यांद्वारे निवासी आणि अनिवासी खेळाडुंना प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी ॲथलेटीक्स, आर्चरी, ज्युदो, हँडबॉल, बॅडमिंटन, शुटिंग, कुस्ती, हॉकी, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, जिम्नॅस्टिक आदी खेळांच्या खेळनिहाय चाचण्यांचे आयोजन करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे. क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ सेवा प्रवेश प्रक्रिया आणि खेळनिहाय कौशल्य चाचणी याबाबत अर्हता पुढीलप्रमाणे आहे. 
सरळ प्रवेश प्रक्रिया-क्रीडा प्रबोधिनीत असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू ज्यांचे वय वर्ष 19 आतील आहे, अशा खेळाडुंना संबंधित खेळाबाबतची चाचणी तज्ज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जातो.
    खेळनिहाय कौशल्य चाचणी-क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंना ज्यांचे वय 19 वर्ष आतील आहे. अशा खेळाडूंना संबंधित खेळाच्या खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करून गुणानुक्रमे प्रवेश निश्चित केला जातो.
    अनिवासी प्रवेश प्रक्रिया- अनिवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशाकरिता अधिकृत राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थान प्राप्त करणाऱ्या खेळाडुंना प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. इतर खेळाडुंची त्यांच्या क्रीडा प्रकारानुसार विविध कौशल्याची चाचणी घेऊन त्याआधारे खेळाडुंना प्रवेश देण्यात येईल. अनिवासी खेळाडू संख्या एका प्रबोधिनीत 25 अशी राहील.विहीत नमुन्यातील अर्ज येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहेत.
                                                        
 
Top