*संपकरी कर्मचाऱ्यांनी एसटीला वेठीस धरु नये : अनिल परब*
उस्मानाबाद/प्रतिनिधी
राज्य सरकारचे एसटी कामगाराबद्दल जसे दायित्व आहे, तसेच हे दायित्व महाराष्ट्रातील जनतेसाठीही आहे. एसटी कामगार ऐकत नसतील तर पर्यायी व्यवस्था करावीच लागेल. ज्या कामगारांवर कारवाई करण्यात आली ती कारवाई मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही, कारण एसटीचे प्रचंड नुकसान झाले आहे आणि होत आहे. राज्य शासन हातावर हात ठेवून बसू शकत नाही. म्हणून अशा अघोषित आणि बेकायदेशीर संपावर कारवाई तर होणार, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज तुळजापूर येथे केले.
श्री. परब आज तुळजापूर येथे श्री.तुळजाभवानी देवींच्या दर्शनानंतर माध्यमांशी बोलत होते.
राज्यात मागील काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घ्यावा म्हणून अनेक वेळा चर्चा केली, वेतनवाढही दिली. तरीही काही कर्मचारी संपावर ठाम आहेत. श्री. परब यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होवून महामंडळाचे होणारे नुकसान थांबवावे, जनतेची त्यातही विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांची होणारी हेळसांड थांबवावी, असे आवाहन केले.
संपावर असलेल्या कामगारांनी सामूहिक आत्मदहन करण्याची परवानगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागितली आहे, असे पत्रकारांनी विचारता श्री.परब म्हणाले, तुमची मागणी खंबीरपणे लावून धरा, तो तुमचा हक्क आहे, पण एसटील वेठीस धरुन नको. आपल्या मागणीसाठी आम्ही कधीही लढू नका म्हटले नाही, लढण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत, परंतु ग्रामीण भागातील लोकांना वेठीस धरुन हा संप चालवू नये, असं आमचे म्हणने आहे, असेही ते म्हणाले. तसेच आपले जीवन संपल्यास आपले कुटुंब उघड्यावर पडते, त्यामुळे असे करु नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.