Views


*जिल्हास्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन*


उस्मानाबाद/प्रतिनिधी


राज्यातील युवकांमध्ये एकात्मतेची भावना जागृत करणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून युवा वर्गातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी केंद्र शासनामार्फत 1994 या वर्षापासून दरवर्षी दि.12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. देशातील संस्कृती आणि परंपरा जतन करून या संस्कृतीचे संवर्धन करणारा प्रातिनिधीक युवा संघ राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होतो.
महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन होवून स्पर्धक विभागस्तरावर सहभागी होतात. त्यातून गुणी कलावंतांची निवड होवून राज्यस्तरावरील युवा महोत्सवासाठी विभागाचा संघ पाठविला जातो. 
2021-22 या वर्षाचे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर ऑनलाईन पद्धतीने दि. 03 जानेवारी, 2022 रोजी करण्यात येणार आहे. यासाठी आपले प्रवेश अर्ज सोबत जोडलेल्या विहित नमुन्यातील अर्जासह दि. 30 डिसेंबर, 2021 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडीयम समिती उस्मानाबाद येथे सादर करावेत. 
आपल्या शाळा, महाविद्यालय, युवक मंडळे यातील इच्छुक कलावंतांना, स्पर्धकांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.
जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये लोकगीत आणि लोकनृत्य या बाबींचा समावेश आहे. त्यामध्ये कलाकारांची संख्या 4 ते 8 आणि वेळेची मर्यादा ही 8 मिनिटे आहे.

*युवा महोत्सव आयोजनाच्या अनुषंगाने महत्वाच्या सूचना:-*
 स्पर्धकांसाठी , कलाकारांसाठी वयोगट 15 ते 29 वर्षे असा राहील. वय दि. 12 जानेवारी 2022 रोजी किमान 15 आणि जास्तीत जास्त 29 असावे. कलाकार हा महाराष्ट्रातील संबंधित जिल्ह्यातील रहिवाशी असणे आवश्यक राहील.(जन्मतारीख 12 जानेवारी 1993 ते 12 जानेवारी 2007)
 स्पर्धकाने नांव नोंदणी करतांना प्रवेशिकेसोबत आपले आधार कार्ड आणि जन्माचा दाखला जोडणे आवश्यक आहे. यासाठी शाळेचे ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही. स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी करताना आपले प्रवेश अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडीयम समिती उस्मानाबाद येथे सादर करावेत. प्रवेश अर्ज सादर करताना सोबत आपला व्हट्सॲप क्रमांक असणे आवश्यक आहे. कोणत्याही स्पर्धकास ऐनवेळी स्पर्धेत सहभगी करून घेण्यात येणार नाही. ज्या स्पर्धकांचे अर्ज दि. 30.12.2021 रोजी पर्यंत कार्यालयास प्राप्त होतील त्याच स्पर्धकांना कला सादर करण्याकरीता कार्यालयाच्या वतीने लिंक पाठविण्यात येईल. जिल्हा स्तर युवा महोत्सव स्पर्धा दि. 03 जानेवारी, 2022 रोजी होईल. दिलेल्या वेळेच्या व्यतिरिक्त कोणत्याही स्पर्धकास ऑनलाईन सादरीकरणाची परवानगी देण्यात येणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि दिलेल्या वेळेतच आपले सादरीकरण करावे. सादर केलेल्या बाबीची व्हिडीओ क्लिप तयार करून कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील. आपली कला सादर करताना विद्युत पुरवठा खंडित होवून आपले सादरीकरणात व्यत्यय येणार नाही याची खबरदारी स्पर्धकांनी स्वत: घ्यायची आहे. असे झाल्यास सर्वस्वी आपली जबाबदारी राहील. त्यामुळे शक्यतो लॅपटॉप, मोबाईलचा वापर करावा. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील, त्यावर कोणताही आक्षेप नोंदविता येणार नाही. 
प्रतिस्पर्धी कलाकारांबाबत काहीही आक्षेप असल्यास योग्य त्या पुराव्यानिषी त्याचवेळी आक्षेप सिद्ध करणे आवश्यक राहील.कलाकारांना कला सादर करतांना कोणत्याही प्रकारची इजा, दुखापत झाल्यास त्यास आयोजन समिती जबाबदार राहणार नाही. 
 लोकगीतामध्ये कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 8 कलाकार, अंतिम निकाल गायनाची गुणवत्ता यावर निश्चित केला जाईल. मेक अप (Make up), पोषाख (Costumes) आणि संघाच्या हावभाव क्रीया (Actions of the Team) याबाबी अंतिम निकालासाठी गृहित धरल्या जाणार नाहीत.
 लोकनृत्यामध्ये सर्व संघ हा मुले, मुली किंवा एकत्रीत असणे आवश्यक आहे. विहित किमान 4 आणि कमाल 8 च्या मर्यादेतच कलाकार असणे बंधनकारक आहे. अंतिम निकाल हा ताल (Rhythm), नृत्य दिग्दर्शन (Choreography), पोषाख (Costumes), मेक अप (Make up), संच (Sets), एकत्रीत परिणाम (Overall Efects) या बाबीवरुन काढण्यात येईल. लोकनृत्यासाठी पुर्वध्वनीमुद्रीत (Pre-recorded) टेप अथवा कॅसेट ला परवानगी दिली जाणार नाही. लोकनृत्याचे गीत चित्रपटबाह्य असावे. सर्वच बाबीसाठी सादरीकरण थिम बेस्ड आणि सार्वजनीक नियमांचे पालन करणारे असणे बंधनकारक राहील. तसेच आवश्यक साहित्य संबंधितास आणावे लागेल. मागील तीन वर्षात राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेले कलाकार युवक - युवती सहभागी होवू शकणार नाहीत. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सादरीकरणाच्या वेळी सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन होणे संबंधितांवर बंधनकारक राहील. असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती भाग्यश्री बिले यांनी कळविले आहे. 


 
Top