Views
*आरोग्य विभागाच्या कायाकल्प कार्यक्रमांतर्गत*
*जिल्हयातील रुग्णाल्यांना पुरस्कार जाहीर*

उस्मानाबाद/प्रतिनिधी


आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कायाकल्प कार्यक्रमांतर्गत जिल्हयातील उपजिल्हा रुग्णालय परंडा, उमरगा, तुळजापुर आणि कळंब तसेच ग्रामीण रुग्णालय सास्तुर, तेर, मुरुम, लोहारा, भूम या आरोग्य संस्थेस 2020-21 या वर्षातील कायाकल्प राज्यस्तीय पुरस्कार जाहिर झाला आहे. पुरस्कार जाहिर झालेल्या रुग्णालयास प्रत्येकी एक लाख रुपये इतकी रक्कम पुरस्कार म्हणून जाहिर करण्यात आली आहे. या रक्कमेचा विनियोग रुग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी करण्यात येणार आहे.या रुग्णालयांना लवकरच राज्यस्तरावरुन पुरस्काराचे वितरण होणार आहे. 
राज्यातील सर्व आरोग्य संस्थेमधील सेवांची गुणवत्ता सुधारणे तसेच आरोग्य संस्था नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके राहण्यासाठी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आरोग्य संस्थेमध्ये कायाकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य संस्थेस पुरस्कार देण्यात येतो. यामध्ये आरोग्य संस्थास्तर, जिल्हास्तर आणि राज्यस्तरावरुन मुल्यांकन करण्यात येते.राज्यस्तरीय पथकामार्फत करण्यात आलेल्या मुल्यांकनमध्ये आरोग्य संस्था पुरस्कारास पात्र ठरली आहे.या मुल्यांकन दरम्यान रुग्णालयामधील जैववैद्यकीय घनकचरा व्यवस्थापन, जंतुसंसर्ग व्यवस्थापन, रुग्णालयातील स्वच्छता, आरोग्य सेवा इत्यादी बाबींची तपासणी करुन गुण दिले जातात.
जिल्हास्तरीय पुरस्कारामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र नाईचाकूर, पाथरुड, दहिफळ,जेवळी, जळकोट, माणकेश्वर, वालवड, आनाळा, सावरगाव, बेंबळी, कोंड या प्राथमिक आरोग्य केंद्राची जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र नाईचाकूर (ता.उमरगा) या प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रथम क्रमांकाचे दोन लाख रुपयांचे बक्षीस स्वरुपात मिळणार आहे.तसेच इतर प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रत्येकी 50 हजार रुपये इतकी रक्कम बक्षीस स्वरुपात मिळणार आहे.
हा पुरस्कार मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डी.के.पाटील,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एन.डी.बोडके यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे,आरोग्य सभापती धनंजय सावंत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.जिल्हास्तरीय अधिकारी यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना आणि प्रशिक्षण इत्यादीच्या माध्यमातुन आरोग्य संस्थेस पुरस्कार मिळण्यासाठी मदत झाली.रुग्णालयांनी पुरस्कार प्राप्त झालेल्या रुग्णालयाचा आदर्श घेऊन आपल्या आरोग्य संस्थेस प्रत्येक वर्षी पुरस्कार मिळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
                             
 
Top