*छत्रपती संभाजीराजेंकडून इंगळे यांना सरकार पदवी बहाल खा. छत्रपती संभाजी महाराजांच्या हस्ते अनाथ, गरिबांना मदतीचा हात*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर,आदर्शावर काम करणार्या शिवराज्यभिषेक सोहळा समितीचे संस्थापक अध्यक्ष विष्णु इंगळे यांना छत्रपती संभाजी महाराज यांनी सरकार ही पदवी बहाल केली आहे. मातोश्री मैनाबाई नरेंद्र इंगळे यांच्या एकसष्टीनिमित्त सोमवारी (दि.8) युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले हे उस्मानाबादेत आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना विष्णु इंगळे यांना त्यांनी सरकार ही पदवी दिली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदवी परिवाराचे संस्थापक डॉ. शिवरत्न शेटे हे होते. पुढे बोलताना युवराज छत्रपती संभाजी महाराज म्हणाले, विष्णु इंगळे यांनी शिवकार्यात स्वतःसह आपल्या कुटुंबाला देखील झोकून अविरतपणे आपल्या कामाचा यज्ञ चालू ठेवला आहे. प्रत्येक सामान्य माणसाप्रमाणे स्वतःच्या स्वप्नातील एक घर असावं असं एक स्वप्न कित्येक लोकांचं असते. हे आयुष्य फक्त घराचं स्वप्न साकारण्यात जात. परंतु इंगळे यांच्या स्वप्नातील घर आणि त्याची संकल्पना देखील त्यांच्या कार्याप्रमाणे अनोखीच आहे. आपल्या आईची एकसष्टी व घराच स्वप्न पूर्ण होत असताना आपण आपल्या मातेची शैक्षणिक तुला करून तुलेच्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यातील अनाथ, गरीब, शेतकरी कुटुंबातील मुलांच्या इयत्ता दहावीपर्यंतच्या शैक्षणिक साहित्याची जबाबदारी स्वीकारून एक नवीन आदर्श समाजापुढे मांडला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. शिवरत्न शेटे यांची, आपल्या खडतर आयुष्यात वडिलांचे छप्पर हरवल्यानंतर आपल्या वडिलांच्या मित्रांनी आपल्या कुटुंबाला केलेली मदत याची जाणीव ठेवत विष्णु इंगळे यांनी आपल्या वडिलांच्या सर्व मित्रांना मानाचं स्थान दिलं त्यांचा गौरव केला. तसेच आपल घरं साकारताना मजूर, ठेकेदार व इतर सर्व लोकांना देखील सन्मानित केले. इंगळे यांच्या वास्तुशांती करिता दस्तुरखुद्द छत्रपती संभाजीराजे यांनी स्वतः हजेरी लावली. उस्मानाबादच्या शिवजयंतीची ख्यातीतर अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. या शिवजयंतीचे शिल्पकार विष्णु इंगळे म्हणजेच आपल्या सर्वांचे अध्यक्ष याव्यतिरिक्त त्यांनी कोरोना काळात केलेली समाजसेवा व इतर कार्याच आणि समाजाप्रती दृष्टीचं कौतुक करताना छत्रपती संभाजीराजे यांनी इंगळे यांना जाहीररित्या सरकार अशी पदवी बहाल केली. छत्रपती संभाजीराजेनीं ही घोषणा करताच आमचा उर अभिमानाने भरून आल्याचे डॉ. शेटे म्हणाले. या कार्यक्रमास आ. कैलास पाटील, मारुती खामकर आदींनी हजेरी लावली होती.