Views


*शिराढोण परिसरात चोरीचा सिलसिला पुन्हा सुरू! आठवडाभरात शिरपू-यातील बैलासह घारगावातील दुचाकीवर चोरट्यांचा डल्ला !!*


कळंब/प्रतिनिधी

गेल्या आठवडाभरात कळंब तालुक्यातील शिराढोण परिसरातल्या आवाड शिरपूरा शिवारातून दोन बैलासह घारगावातील दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार शिराढोण पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. यामुळे परिसरातील पशुपालकासह शेतकरी व्यापारी वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे.

        या बाबत सविस्तर वृत्त असे की, धनेगाव येथील रहिवासी असणारे विश्वमित्र माणिकराव पाटील यांची शेती आवाड शिरपूरा शिवारात असून, त्यांच्या २९६ गट नंबर शेतातून दि.२६ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दोन बैल चोरून नेल्याची तक्रार त्यांनी शिराढोण पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. तर घारगाव येथील रवींद्र रामविलास तापडे यांच्या राहत्या घरासमोरुन पहाटेच्या सुमारास एम एच २४ झेड ५४३५ या क्रमांकाची हिरो होंडा कंपनीची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार शिराढोण पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात चोराविषयी भीती पसरली आहे. शिराढोण परिसर हे उस्मानाबाद जिल्ह्याच्या हद्दीवरील शेवटचा भाग म्हणून ओळखला जाते. शेजारच्या लातूर जिल्ह्यासह बीड जिल्ह्याच्या सरहद्दी याच परिसरातून सुरू होतात. त्यामुळे या भागातून सतत वर्दळ अधिक प्रमाणात असते. मागच्या पंधरवड्यात शिराढोण परिसरात चोरीचे प्रमाण काही अंशी घटले होते. मात्र मागच्या आठवड्यात दोन चो-या झाल्याने शेतक-यांसह, कष्टकरी मजूरवर्ग व व्यापारी वर्गामध्ये चोरट्यांची भिती पुन्हा निर्माण झाली असल्याचे पहावयास मिळत आहे. तरी परिसरातील अज्ञात चोरट्यांच्या मुसक्या आवळून त्यांना तात्काळ जेरबंद करण्यात यावे. असी मागणी शिराढोणसह परिसरातील नागरिकांतून जोर धरू लागली आहे.


 
Top