Views


*सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या सहायाने नळदुर्ग पोलीसाकडून चोरीच्या रकमेसह आरोपी पहिल्या दिवशीच ताब्यात!*


उस्मानाबाद/ प्रतिनिधी

नळदुर्ग येथील बाजार लाईन परिसरातील किराणा दुकानाच्या शटरचे कुलूप चोरट्याने दि. 02 नोव्हेंबर दरम्यानच्या रात्री तोडून दुकानातील15,000 रुपये रक्कमेसह तिजोरीतील 4,00,000 ₹ रोख रक्कम व सीसीटीव्हीची रेकॉर्डर चोरुन नेला होता. यावरुन दुकान मालक- उमेश नाईक यांनी दि. 03 नोव्हेंबर रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता.
         गुन्हा तपासादरम्यान तुळजापूर पोलीस उप अधीक्षक श्रीमती- सई भोरे-पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच उस्मानाबाद पोलीस मुख्यालयातील अंगुली मुद्रा तज्ञ पथक, माग घेनारा श्वान- प्लुटो यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. नळदुर्ग पोलिस ठाण्याचे प्रभारी- श्री. जगदीश राऊत यांच्यासह सपोनि- श्री. मोटे, पोहेकॉ- बांगर, पोना- शेख यांच्या पथकाने आपले कौशल्यपणास लावले. यावेळी परिसरातील एका औषधालयाच्या सीसीटीव्ही छायाचित्रणाचा अभ्यास केला असता मध्यरात्री नंतर एक युवक या परिसरातून पायी जात असल्याचे अस्पष्टपणे दिसून आले. त्या युवकाचा चेहरा स्पष्टपणे समजून येत नसल्याने पोलीसांनी त्याचा बांधा व चालण्याची शैली यावर लक्ष केंद्रीत केले. यातून तो युवक परिसरातीलच एक 17 वर्षीय युवक (विधी संघर्ष ग्रस्त बालक) असल्याचा संशय बळावला. यावर पथकाने त्या युवकास त्याच रस्त्याने त्याच औषध दुकानासमोरुन पायी चालण्यास सांगून त्याच्या चालण्याची शैली त्याच सीसीटीव्ही कॅमेरा- टीव्हीवर अभ्यासली. यातून तो मुलगाच चोरीत सहभागी असावा अशी पोलीसांची खात्री झाली.

चोराने घटनास्थळी सोडलेल्या तुटक्या कुलूपाचा वास श्वान- प्लुटो यास देउन आरोपी नक्की कोण आहे याची पुरेपुर निश्चिती करण्याचे, आरोपी येण्या -जाण्याचा मार्ग शोधण्याचे पोलीसांनी ठरवले. याकरीता त्या संशयीत मुलासह 7 व्यक्ती एका रांगेत उभ्‌या करण्यात आल्या. यावर श्वान हस्तक पोना- स्वप्नील ढोणे व सुरज कोरडे यांनी श्वान- प्लुटो यास ते तुटलेले कुलूप हुंगण्यास देताच प्लुटोने घटनास्थळी हुंगून, घुटमळून माग काढला आणि तात्काळ त्या 7 व्यक्तींच्या मध्ये उभ्या असलेल्या संशयीतावर भुंकण्यास सुरुवात केली. पोलीसांनी त्या मुलास विश्वासात घेउन विचारपुस करता त्याने चोरीची कबूली देउन लपवलेली नमूद रक्कम पोलीसांना काढून दिली. अशा रितीने सीसीटीव्ही छायाचित्रनाच्या सहायाने पोलीस आरोपी पर्यंत पोहचण्यास यशस्वी ठरले. असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 
Top