Views

*क्षयरुग्ण शोध मोहिम -2021*


*15  ते 25 नोव्हेंबर राबविण्यात येणार*
 
            

उस्मानाबाद/ प्रतिनिधी

जिल्हयामध्ये प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोधमोहिमेचा शुभांरभ होत असून पहिला टप्पा 15 ते 25 नोव्हेंबर 2021 पर्यंत होणार आहे.राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत शहरी व ग्रामीण भागात अति जोखमीच्या ठिकाणी तयार केलेल्या कृती आराखडयानुसार आरोग्य कर्मचारी,अशा स्वयंसेवी , क्षेत्रीय स्तरावरील आरोग्य कर्मचारी स्वयंसेवक यांचे 125 पथकाव्दारे दररोज 40 ते 50 घरांना भेटी देणार आहेत.यामध्ये 50045 कुटुंबाचे संरक्षण केले जाणार आहे.
          या मोहिमेचे उदिष्ट क्षयरोगाच्या निदाना अभावी अद्यापही वंचित असणाऱ्या संशयीत क्षय रुग्णांचा शोध घेऊन त्यांना क्षयरोग निदान करून औषधोपचारावर आणणे हे आहे.या मोहिमेमध्ये प्रशिक्षित पथकाव्दारे घरो घरी भेट देऊन क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येऊन संशयीत क्षय रुग्णांचे थुंकी नमुने व एक्स –रे तपासणी, सीबीनॅट तपासणी तसेच आवश्यकतेनुसार इतर तपासण्या करण्यात येणार आहेत.क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तीचे रोग निदान व नवीन आढळलेल्या क्षयरुग्णांचा औषधोपचार सार्वजनिक आरोग्य संस्थां मध्ये मोफत उपलब्ध आहे.
          जिल्हयात ही मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी आपल्या घरी सर्वेक्षणासाठी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यास व अशा कार्यकर्ती  व स्वयंसेवकास क्षयरोग आजारा विषयी संपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी ,उस्मानाबाद व  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी केले आहे.
 

 
Top