*उस्मानाबाद जिल्हयात कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक निर्बंध लागू*
उस्मानाबाद/प्रतिनिधी
त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर रझा अकादमीने 12 नोव्हेंबर रोजी पुकारलेल्या बंद दरम्यान घडलेल्या घटनेचे पडसाद उमटुन महाराष्ट्रात अमरावती,नांदेड,मालेगाव,पुसद आणि कारंजा या ठिकाणी अशांतता निर्माण झाली आहे . घटनेचा फायदा घेवून उस्मानाबाद जिल्हयामध्ये काही समाजसकंटक इंस्टाग्राम,व्हॉटअप,ट्वीटर, फेसबूक इत्यादी समाज माध्यमाद्वारे दोन समाजमध्ये,गटामध्ये तेढ निर्माण करण्याची शक्यता निर्माण झाल्याने उपाय योजना म्हणून भारतीय दंड संहितेच्या कलम (CRPC )144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येत आहेत.
त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्हयातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये कायदा व सुव्यवस्थेसाठी प्रतिबंधात्मक आदेश दि.16 नोव्हेंबर 2021 चे 00.01 ते दि.23 नोव्हेंबर 2021 रोजीचे 24: 00 वाजेपर्यंत लागू असतील. या कालावधीत पुढील बाबी करण्यास मनाई करण्यात येत आहे.
कोणीही व्यक्ती इंस्टाग्राम,व्हॉटसअप,टवीटर ,फेसबुक इत्यादी समाज माध्यमाद्वारे जातीय तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टी पसरविणे.कोणीही व्यक्ती इंस्टाग्राम,व्हॉटसअप,टवीटर,फेसबुक इत्यादी समाज माध्यमाद्वारे आक्षेपार्ह पोस्ट टाकणे/शेअर करणे,अशा कृत्य केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रुप ॲडमिनची राहील.
समाज माध्यमांमध्ये चुकीची माहिती/अफवा जाणीवपुर्वक प्रसारित करणे.पाच व पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येणे,सभा घेणे तसेच शस्त्र लाठी,काठी बाळागणे.कोणत्याही प्रकारे जातीय तणाव निर्माण करणाऱ्या मजकुराचे फलेक्स बोर्ड लावणे व त्या प्रकारच्या घोषणा देणे,याबाबी करण्यास मनाई करण्यात येत आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड विधान कायद्याचे कलम 188 प्रमाणे दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील,असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जारी केले आहेत.