Views


*विद्याभवन हायस्कूल कळंब येथील विद्यार्थी यांनी दिला स्त्री शिक्षणाचा संदेश...*


कळंब/प्रतिनिधी

 तालुक्यामध्ये दिनांक ०२ ऑक्टोबर २०२१ ते १४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत साजरा होत असलेल्या ''आजादी का अमृत महोत्सव'' अंतर्गत भारतभर जागरूकता व पोहोच कार्यक्रम (Pan India Awareness and Outreach Programme) च्या अनुषंगाने महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती कळंब व विद्याभवन हायस्कूल कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ ऑक्टोबर, २०२१ रोजी दिवाणी न्यायालय क. स्तर कळंब च्या परिसरामध्ये विद्याभवन हायस्कूल कळंब येथील विद्यार्थी यांनी शिक्षणाचा अधिकार या विषयावर नाटिकेचे सादरीकरण केले.
  सदरील नाटिकेच्या माध्यमातून स्त्री शिक्षणाचे महत्त्व समजावून देताना आजच्या युगामध्ये स्त्रियांमधील असलेल्या निरक्षरतेमुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगत कुटूंबातील एक स्त्री शिकल्यास संपूर्ण कुटूंब शिकते असा मोलाचा संदेश याठिकाणी दिला. शिक्षण न घेतल्यामुळे स्त्रियांना केवळ चूल आणि मुल या उक्तीप्रमाणेचे वागणूक आजही ग्रामीण भागामध्ये दिली जात असल्याने नाटिकेचे माध्यमातून दाखवून देताना अत्यंत मार्मिक पद्धतीने स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मुलगी शिकेल तरच प्रगती होईल असा संदेश दिला. त्याचप्रमाणे ग्रामीण भागामधील स्त्री साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी समाजातील सर्वच स्तरातील व्यक्तींनी पुढाकार घेवून स्त्री शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे, असे नाटिकेचे माध्यमातून नमूद केले.
  सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कळंब श्री. महेश ठाेंबरे सर यांची प्रमुख उपस्थिती होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब श्री. महंतेश कुडते सर, दुसरे सहदिवाणी न्यायालय क. स्तर कळंब श्रीमती आर. आर. कुलकर्णी मॅडम तसेच विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. श्री. मंदार मुळीक हे देखील उपस्थित होते. सदरील कार्यक्रमामध्ये विद्याभवन हायस्कूल कळंब येथील विद्यार्थी कु. रोहिणी मधुकर बारस्कर, आर्या प्रशांत काकडे, सायली सतीश पवार, संचिता सतीश सव्वाशे, स्वाती महादेव बारस्कर, स्नेहा राजेंद्र आवटे, तेजस्विनी कृष्णा गुजर, मयुरी बाळासाहेब कोल्हे, राजनंदिनी शंकर लोंढे, माधवी मधुकर टेकाळे, वैष्णवी शिवाजी लांडगे, सृष्टी सुहास जगताप, साक्षी जावळे, अक्षरा विलास सुरवसे, यांनी सहभाग घेतला होता. तसेच नाटिकेसाठी विद्याभवन हायस्कूल कळंब चे मुख्याध्यापक श्री. विलास पवार सर, साेनके ज्योतीराम, आशा राऊत, आप्पासाहेब वाघमोडे आदींनी मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी न्यायालयीन कर्मचारी वरिष्ठ लिपीक सुनील परदेशी, कनिष्ठ लिपीक इरफान मुल्ला, शिपाई सावनकुमार धामनगे, लवांडे, संतोष भांडे, सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
 
Top