Views


*''आजादी का अमृत महोत्सव'' अंतर्गत दिवाणी न्यायालय क. स्तर कळंब याठिकाणी कायदेविषयक जागरूकता शिबीर संपन्न...*



कळंब /प्रतिनिधी


तालुक्यामध्ये दिनांक ०२ ऑक्टोबर २०२१ ते १४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत साजरा होत असलेल्या ''आजादी का अमृत महोत्सव'' अंतर्गत भारतभर जागरूकता व पोहोच कार्यक्रम (Pan India Awareness and Outreach Programme) च्या अनुषंगाने महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती कळंब व विधीज्ञ मंडळ कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ ऑक्टोबर, २०२१ रोजी दिवाणी न्यायालय क. स्तर कळंब या ठिकाणी NALSA योजनांविषयी जागरूकता, अन्नाच्या अधिकारावर कायदेशीर साक्षरता शिबीर, शिक्षणाचा अधिकार इ. (Awareness about NALSA Schemes, Legal Literacy Camps on Right to Food, Right to Education etc.) विषयावर जागरूकता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
 सदरील शिबीरामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती एम. एस. भदाणे मॅडम मुख्य न्यायदंडाधिकारी उस्मानाबाद यांची प्रमुख उपस्थिती हाेती. कार्यक्रमाच्या अनुषंगाने बोलताना त्या म्हणाल्या की, अशा प्रकारच्या कार्यक्रमामधून जनसामान्यांपर्यंत विविध कायदेशीर बाबींची माहिती पोहोचविण्यास मदत होत आहे. तसेच त्यांनी असेही नमूद केले की, नागरिकांनी आपले वाद मिटविण्यासाठी सामाेपचाराचा मार्ग निवडल्यास लोकांचा वेळ आणि पैसा दोहोंची बचत होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे माणूस हा मानसिकदृष्ट्या सदृढ असेल तर वादच उद्भवणार नाहीत आणि त्यासाठी आध्यात्मिक मार्गाचा अवलंब सर्वांनीच करायला पाहिजे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अॅड. श्री. बी. बी. साठे यांनी भारतभर जागरूकता व पोहोच कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजित होत असलेल्या शिबीरांमुळे विविध कायद्यांची माहिती सर्वांना होणे हाच यामागचा प्रमुख उद्देश्य असल्याचे नमूद केले. तर कळंब येथील जेष्ठ विधीज्ञ अॅड. श्री. टी. बी. मनगिरे यांनी शिक्षणाचा अधिकार या विषयावर बाेलताना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम २००९ मुळे आर्थिक दुर्बलतेमुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी हा कायदा असल्याचे उपस्थितांना सांगितले. तसेच सर्वांना पोटभर अन्न मिळणे हा देखील सर्वांचा अधिकार असल्याचे नमूद करून त्यासाठी देखील विविध कायदे असल्याचे सांगितले.
 सदरील शिबीरामध्ये सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब श्री. महंतेश कुडते यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत असलेल्या विविध योजनांसंबंधी बहुमुल्य अशी माहिती सर्व उपस्थितांना देऊन सदरील योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना मिळण्यासाठी योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जागरूकता शिबीर महत्त्वपूर्ण भुमिका पार पाडत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या अनुषंगाने अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कळंब तथा दिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब श्री. महेश ठाेंबरे यांनी मोफत शिक्षणाचा अधिकार हा सर्वांनाचा असल्याचे सांगून जर कोणी यापासून एखाद्याला वंचित ठेवत असेल तर त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूददेखील कायद्यात असल्याचे नमूद केले. तसेच सुरक्षित अन्नासोबत सर्वांसाठी पोटभर अन्न हा देखील मुलभूत अधिकार असल्याचे नमूद केले. सदरील कार्यक्रमाचे सूत्र संचलन अॅड. श्री. प्रविण यादव यांनी केले तर आभार प्रदर्शन अॅड. विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. श्री. मंदार मुळीक यांनी केले. सदरील जागरूकता शिबीरासाठी अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब श्री. महेश ठाेंबरे, सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब श्री. महंतेश कुडते, दुसरे सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब श्रीमती आर. आर. कुलकर्णी मॅडम तसेच विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. श्री. मंदार मुळीक तसेच न्यायालयीन कर्मचारी, विधीज्ञ व नागरिक माेठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी न्यायालयीन कर्मचारी सहाय्यक अधीक्षक विष्णू डोके, कनिष्ठ लिपीक इरफान मुल्ला, शिपाई सावनकुमार धामनगे, संतोष भांडे आदींनी परिश्रम घेतले.
 
Top