Views


*मानसिक आरोग्य ही काळाची गरज - न्यायाधीश ठोंबरे*

कळंब/प्रतिनिधी


तालुक्यामध्ये दिनांक ०२ ऑक्टोबर २०२१ ते १४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत साजरा होत असलेल्या ''आजादी का अमृत महोत्सव'' अंतर्गत भारतभर जागरूकता व पोहोच कार्यक्रम (Pan India Awareness and Outreach Programme) च्या अनुषंगाने महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती कळंब व विधीज्ञ मंडळ कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १० ऑक्टोबर, २०२१ रोजी ग्रामीण रुग्णालय कळंब या ठिकाणी मानसिक आरोग्य दिनाच्या अनुषंगाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (मानसिक आजारी आणि मतिमंद व्यक्तीला कायदेशीर सेवा) योजना २०१५ या विषयावर माहिती देण्यासाठी कायदेशीर जागरूकता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
            सदरील शिबीराचे प्रास्ताविक करताना न्यायालयीन कर्मचारी श्री इरफान मुल्ला यांनी आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित होत असलेल्या विविध जागरुकता शिबिरांमधून सर्वसामान्य जनतेसाठी असलेल्या विविध योजनांबाबतची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा या शिबिराचा मुख्य हेतू असल्याचे नमूद केले. सदरील शिबिरामध्ये मानसिक आरोग्य दिनानिमित्त परिचारिका श्रीमती गोरे, डॉ. वाकुरे, डॉ. पुरुषोत्तम पाटील तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे यांनी सध्याच्या युगात मनुष्य केवळ शारीरिक आजाराने ग्रस्त आहे असे नसून बऱ्याच रुग्णांमध्ये मानसिक आजार दिसून येत असल्याचे नमूद करून अशा व्यक्तींनी आपला आजार लपवून न ठेवता त्यावर योग्य वेळी उपचार घेण्याचे आवाहन केले. तसेच पोलीस निरीक्षक श्री यशवंत जाधव यांनी मानसिक आरोग्य नीट जपले तरच माणूस शारीरिक दृष्ट्या सक्षम राहू शकतो असे नमूद करून आरोग्य कर्मचारी देत असलेल्या सेवेबद्दल त्यांचे कौतुक केले. 
           सदरील शिबिरामध्ये अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर कळंब श्री. महेश ठोंबरे यांनी मानसिक आरोग्य हे देखील शारीरिक आरोग्य इतकेच महत्त्वपूर्ण असल्याचे उपस्थितांना सांगून सध्याच्या युगात मानसिक आरोग्य ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. त्याच प्रमाणे मानसिक रुग्णांसाठी असलेल्या मानसिक आरोग्य कायद्याविषयी मूलभूत अशी माहिती देऊन मानसिक रुग्णांसाठी असलेल्या विविध सेवा-सवलती बाबतची माहिती उपस्थितांना दिली. सोबतच समाजातील मानसिक रुग्णांना तिरस्काराची वागणूक न देता अशा रुग्णांसाठी समाजातील व्यक्तींनी सद्भावना दाखवून त्यांना योग्य उपचारासाठी मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. सदरील कार्यक्रमाचे सूत्र संचलन ग्रामीण रुग्णालयातील समुपदेशक श्रीमती भंडारे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन परिचारिका श्रीमती गोरे यांनी केले. सदरील जागरूकता शिबीरासाठी कळंब पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री यशवंत जाधव तसेच विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. श्री. मंदार मुळीक यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे सदरील कार्यक्रमासाठी न्यायालयीन कर्मचारी वरिष्ठ लिपीक सुनिल परदेशी, कनिष्ठ लिपिक इरफान मुल्ला, शिपाई सावनकुमार धामनगे, संतोष भांडे, ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी व नागरिक माेठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top