Views


*''आजादी का अमृत महोत्सव'' अंतर्गत महिलांसाठी दिवाणी न्यायालय क. स्तर कळंब याठिकाणी कायदेविषयक जागरूकता शिबीराचे आयोजन.*


कळंब/प्रतिनिधी

    तालुक्यामध्ये दिनांक ०२ ऑक्टोबर २०२१ ते १४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत साजरा होत असलेल्या ''आजादी का अमृत महोत्सव'' अंतर्गत भारतभर जागरूकता व पोहोच कार्यक्रम (Pan India Awareness and Outreach Programme) च्या अनुषंगाने महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती कळंब व विधीज्ञ मंडळ कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२ ऑक्टोबर, २०२१ रोजी दिवाणी न्यायालय क. स्तर कळंब या ठिकाणी लैंगिक अत्याचार व इतर अपराधा पासून वाचलेल्या पीडित महिलांसाठी असलेल्या भरपाई योजना संदर्भात माहिती देण्यासाठी कायदेशीर जागरूकता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
 सदरील शिबीरामध्ये दुसरे सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब श्रीमती आर. आर. कुलकर्णी मॅडम यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांचेमार्फत पीडित महिलांसाठी असलेल्या विविध योजना संदर्भात माहिती देऊन शासनामार्फत असलेल्या सोयी सवलती बाबतची महत्वपूर्ण माहिती उपस्थितांना दिली. तत्पूर्वी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. श्री. मंदार मुळीक यांनी सद्यस्थितीमध्ये महिलांवर होत असलेल्या अत्याचाराविषयी खेद व्यक्त करून सदरील कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांसाठी असलेल्या योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा या शिबीराचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.
          कार्यक्रमाच्या अनुषंगाने अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कळंब तथा दिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब श्री. महेश ठाेंबरे यांनी ''रावण जळत असताना रावणाने हसून गर्दीकडे बघितलं... तपासा स्वतःच्या चारित्र्याला मोठ्यानं त्यानं विचारलं... केलाय मी गुन्हा सीतेचं अपहरण करण्याचा... प्रयत्न नाही केला मर्यादेची सीमा ओलांडण्याचा..." या कवितेच्या माध्यमातून अत्यंत मार्मिकरीत्या समाजातील दुष्प्रवृत्तीच्या लोकांनी स्त्रियांचा आदर, मान-सन्मान करायला हवा असा मोलाचा संदेश दिला. सदरील कार्यक्रमाचे सूत्र संचलन अॅड. श्री. ए.एन. ढेपे यांनी केले तर आभार प्रदर्शन अॅड. श्री. ए. बी. चोंदे यांनी केले. सदरील जागरूकता शिबीरासाठी अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब श्री. महेश ठाेंबरे, सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब श्री. महंतेश कुडते तसेच विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. श्री. मंदार मुळीक यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे सदरील कार्यक्रमासाठी न्यायालयीन कर्मचारी, विधीज्ञ व नागरिक माेठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी न्यायालयीन कर्मचारी वरिष्ठ लिपीक सुनील परदेशी, शिपाई सावनकुमार धामनगे, लवांडे, संतोष भांडे, सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

 
Top