*आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत पंचायत समिती कळंब याठिकाणी जागरूकता शिबीराचे आयोजन...*
कळंब /प्रतिनिधी
तालुक्यामध्ये तालुका विधी सेवा समिती कळंब व विधीज्ञ मंडळ कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार दिनांक ०२ ऑक्टोबर २०२१ ते १४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत साजरा होत असलेल्या ''आजादी का अमृत महोत्सव'' निमित्ताने भारतभर जागरूकता व पोहोच कार्यक्रम (Pan India Awareness and Outreach Programme) अंतर्गत दिनांक ०७ ऑक्टोबर २०२१ रोजी पंचायत समिती कळंब या ठिकाणी सार्वजनिक उपयोगिता सेवा, केंद्र / राज्य सरकारच्या योजनांबद्दल जागरूकता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पंचायत समिती येथील विस्तार अधिकारी (कृषि) मोहन बंडगर यांनी उपस्थितांना कार्यक्रमाचे स्वरुप सांगून कार्यक्रमास सुरूवात केली. तसेच विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष मंदार मुळीक यांनी जागरूकता शिबीराच्या अनुषंगाने उपस्थितांना विधी सेवा समितीविषयी सविस्तर माहिती देऊन तालुका विधी सेवा समितीमार्फत नागरिकांसाठी असलेल्या विविध सेवांबाबतची माहिती दिली. सदरील कार्यक्रमामध्ये पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (कृषि) मोहन बंडगर, कनिष्ठ अभियंता अभिजीत टेकाळे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी लक्ष्मण उलगे यांनी राष्ट्रीय बायोगॅस योजना, प्रधानमंत्री आवास योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना इ. शासकीय योजनांबाबत सविस्तर माहिती उपस्थित नागरिकांना देऊन जास्तीत जास्त लोकांनी या योजनांचा लाभ घेणेबाबत आवाहन केले. त्याचप्रमाणे गटशिक्षणाधिकारी मधुकर तोडकर यांनी शालेय पोषण आहार योजना, बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा कायदा याविषयी माहिती देऊन शिक्षणाचा अधिकार अंतर्गत उपलब्ध असलेल्या सुविधांबाबत सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामसेवक अमाेल सरवदे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. सदरील कार्यमासाठी तालुका विधी सेवा समिती कळंब येथील न्यायालयीन कर्मचारी कनिष्ठ लिपीक इरफान मुल्ला, शिपाई सावनकुमार धामनगे, संतोष भांडे, विधीज्ञ मंडळाचे उपाध्यक्ष विशाल दुगाने, पंचायत समितीचे कक्षअधिकारी बापू बोंदर, अधीक्षक कुंदन ठोकळ, विस्तार अधिकारी (पं.) भागवत जोगदंड, पंचायत समितीचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.