Views


*शेतक-यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील : पालकमंत्री शंकरराव गडाख*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 शेतक-यांना समृद्ध करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.अतिवृष्टीमुळे शेतक-यांच्या झालेल्या नुकसानाची महाराष्ट्र शासनाला जाणीव आहे, त्यामुळे शेतक-यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी कळंब तालुक्यातील मौजे खोंदला येथे केले. जिल्ह्यातील वाशी आणि कळंब तालुक्यातील कोल्हापुरी बंधा-यांच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री. सावंत, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी चेतन कलशेट्टी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेश तीर्थकर, वाशीचे तहसीलदार एन.बी.जाधव, कळंबचे तहसीलदार रोहन शिंदे आदी उपस्थित होते. मराठवाडा हा दुष्काळी भाग असल्याने येथील प्रकल्प आणि बंधारे कमी क्षमतेचे आहेत. त्यात उस्मानाबाद आणि बीड हे जिल्हे अतिशय कमी पावसाचे असल्याने पूर्वी बांधलेले बंधारे आणि केटीवेअर त्या धर्तीवरच बांधण्यात आले असावेत. म्हणून यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे बंधारे क्षतिग्रस्त झाले आणि अनेक गावांमध्ये पूर आल्याने कृषीधन आणि पशुधनाची मोठ्याप्रमाणात हानी झाली. शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे आता जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.यात आता लातूर जिल्ह्याप्रमाणे बॅरेजेस आणि केटीवेअरला एकत्रित स्वयंचलित गेटस बसविण्यात येतील, असेही पालकमंत्री श्री.गडाख यांनी यावेळी सांगितले. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा आणि मांजरा नदीवरील 24 प्रकल्पांची एकाचवेळी दुरुस्ती करण्याचा शासनाचा मानस आहे. यासाठी सर्व 24 प्रकल्पांचा सर्व्हे करण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. सर्व्हेसाठी मी जिल्ह्याधिक-यांना डीपीडीसी च्या माध्यामातून 1 कोटी 25 लाख रुपये निधी तात्काळ मंजूर करून वितरीत करण्याबाबत आदेश दिले आहेत. या प्रकल्पांचे काम परिपूर्ण आणि अतिशय दर्जेदार करण्यात येणार आहे. यासाठी कमीत कमी 100 कोटी रुपये इतक्या निधीची आवश्यक्ता लागेल . जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या अधिका-यांनी लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे, असे आदेशही मी दिले आहेत, असेही श्री. गडाख यावेळी म्हणाले. या पाहणी दौ-यादरम्यान वाशी तालुक्यातील पारा या गावात महाराष्ट्र शासन आणि कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या “प्रात्यक्षिक व प्रमाणित बियाणे वितरण सप्ताह 18 ते 24 ऑक्टोबर” या कार्यकमाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. शेतकऱ्याला सुखी करण्यासाठी हे शासन प्रमाणिकपणे प्रयत्न करीत आहे. राज्य शासनाकडून शेतक-यांच्या उद्धाराच्या दृष्टीकोणातून अनेक योजना राबविल्या जात आहेत.कितीही अडचणी आल्या तरी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे ,असेही श्री.गडाख यावेळी म्हणाले. निसर्गाच्या अवकृपेमुळे 2021 च्या खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. मात्र आता जिल्ह्यात पाणी आवश्यक्तेनुसार उपलब्ध असल्याने रब्बी हंगामात शेतक-यांना योग्य प्रमाणात पीक उत्पादन मिळावे यासाठी राज्य शासनामार्फत प्रात्याक्षिक बियाणे वितरण योजना राबविली जात आहे. यामध्ये महाडिबीटी अंतर्गत लॉटरीपद्धतीने निवड झालेल्या लाभार्थ्यांना शासन सबसिडीतून हरभरा,ज्वारी आणि इतर बियाणे वितरीत करीत आहे, असेही ते म्हणाले. वाशी तालुक्यातील 400 लाभार्थ्यांना हरभरा बियाणे आणि 800 लाभार्थ्यांना ज्वारी बियाणे वितरीत केले जाणार आहे.
 
Top