Views




*काठीने मारहाणीत एकाचा मृत्यू*


लोहारा/इकबाल मुल्ला

पत्नी व मुलास मारहाण करीत असताना सोडवायला गेलेल्या शेजाऱ्याचा काठीने मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता.८) पहाटे अडीच वाजता रुद्रवाडी (ता लोहारा) येथे घडली आहे. यावेळी आरोपीच्या मारहाणीत आरोपींचे पत्नी, आई मुलं, असे सहाजण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे दाखल करण्यात आले आहे. दक्षिण जेवळी बीट ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या रुद्रवाडी (ता लोहारा) गावची लोकसंख्या ही जवळपास एक हजार आहे. येथील बहुतांश नागरिक हे शेतमजूर व शेतकरी असून गावात सहसा शांतता असते परंतु बुधवारी (ता.८) पहाटे या एका घटनेमुळे हादरून गेले आहे. या बाबत माहीती अशी की, येथील शिवाजी चंद्रकांत शिंदे (वय ३४) यांनी पहाटे अडीच वाजता आपल्या कुटुंबातील वादावादी नंतर कुटुंबातील सदस्यांना वेळूच्या भरीव काठीने जबर मारहाणीस सुरुवात केली. यावेळी झालेल्या आरडा-ओरडी नंतर शेजारी असलेले गुलचंद हरिबा शिंदे (वय ६०) हे भांडण सोडवायला गेले असता आरोपी शिवाजी शिंदे यांनी सोडवायला आलेल्या गुलचंद शिंदे यांना काठीने मारहाण करीत गंभीर जखमी केले या मारहाणी नंतर ते बेशुद्ध पडले. यानंतरही आरोपीने काठीने आपली पत्नी सरोजा शिवाजी शिंदे (वय ३०) आई जिजाबाई चंद्रकांत शिंदे (वय ५५) मुलगी कावेरी शिवाजी शिंदे (वय पाच) मुलगा संतोष शिवाजी शिंदे (वय- चार) व मुलगी कविता शिवाजी शिंदे (वय तीन) यांना मारहाण करीत गंभीर जखमी केले. यानंतर आरोपी घराबाहेर येऊन शेजारील बब्रुवान रंग हराळे यास डोक्यात काठी मारून जखमी केले. या घटनेनंतर नागरिकांनी एकत्र येऊन आरोपीला पकडून घरात कोंडवल व तातडीने सर्व जखमींना उपचारासाठी उमरगा येथे पाठविले यातील बहुतांश जखमीचे प्रकृती गंभीर बनल्याने तेथून त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूरला पाठवले आहे. यात जखमी शेजारी गुलचंद हरिबा शिंदे यांचा सोलापूरकडे नेत असताना रस्त्यात मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे व बिट अंमलदार डी.जी. पठाण घटनास्थळी दाखल होत आरोपीला ताब्यात घेऊन तपास चालू केला आहे. मयताचा भाऊ भालचंद्र शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी फॉरसिक टीमला पाचारण केले असून गांभीर्य ओळखून उपविभागीय अधिकारी अनुराधा उदमले यांनी भेट दिले आहे.


 
Top