Views


*जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी भाजपा उस्मानाबाद यांच्या वतीने पालकमंत्री गडाख यांना निवेदन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर व आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वखाली उस्मानाबाद जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना.शंकरराव गडाख यांना उस्मानाबाद जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी भाजपा उस्मानाबाद यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या एक आठवड्यात अभूतपूर्व असा पाऊस पडत आहे. गेल्या दोन दिवसात तर पावसाने हाहाकार माजविला आहे, अनेक गावात अभूतपूर्व अशी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांत पाहणी केली असता पूर परिस्थितीमुळे या भागातील सामान्य जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होवून मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. यात शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे खास करून सोयाबीन पिकाचे काढणीला आलेले व काढून ठेवलेले सोयाबीन पाण्याखाली गेले असून ऊसा सारखे नगदी पिक देखील आडवी झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे, जनावरे, शेळ्या-मेंढ्या, गोठा, गावातील छोटे व्यावसायिक तसेच शेतीतील इतर नुकसानही मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसते. रस्ते, पूल, बंधारे वाहून गेले आहेत तर वीज वितरण व्यवस्थेचं देखील मोठे नुकसान झाले आहे. १५ दिवसापूर्वी पिकांची परिस्थिती थोडी सुधारलेली होती त्यामुळे शेतकरी या हंगामात कांही प्रमाणात तरी उत्पन्न मिळेल या आशेवर बसले होते. मात्र पावसाने त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संकटात गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीने अजून भर पडली आहे. एकीकडे गत वर्षीचा पीक विमा अद्याप मिळाला नाही. चालू हंगामातील झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी पीक विम्याची अग्रीम मंजुरीचा आदेश काढून देखील अग्रीम निधी अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही. अशा परिस्थितीत मायबाप सरकारने नुकसानीची व्याप्ती पाहता यावर चर्चा न करता सरसकट भरीव निधी देणे अपेक्षित आहे व ती तातडीने देण्याची मागणी आम्ही करत आहोत. सणासुदीचे दिवस जवळ आले असताना हाता तोंडाशी आलेला घास हिरावला असल्याने जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाले आहेत. आता त्यांना झालेल्या नुकसानीपोटी तातडीने आर्थिक मदत देणे गरजेचे आहे. ऑक्टोबर, २०१९ मध्ये अवकाळी पावसानं राज्यात अनेक ठिकाणी असेच नुकसान केले होते. तेंव्हा औरंगाबाद येथे नुकसानीची पाहणी केल्यावर आपण सरकारला कोणत्याही अटी न ठेवता तातडीने हेक्टरी रु.२५,००० ते रु..५०,००० मदत देण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री या नात्याने आपण त्वरेने शेतकऱ्यांच्या हितासाठी गेल्यावर्षी केलेल्या न्याय्य मागणीची पूर्तता करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा आहे. आपण मुख्यमंत्री या नात्याने संकटातील जनतेला तातडीने मदत म्हणुन खालील बाबी करणे गरजेचे आहे.
१) उस्मानाबाद जिल्हयात अतिवृष्टीमुळे बाधीत झालेले शेतकरी व नागरीकांना ओला दुष्काळ जाहीर करुन तातडीने विशेष मदत जाहीर करणे.
२) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी तातडीने कोरडवाहू पिकांना सरसकट हेक्टरी रु.२५,०००/- तर बागायती व फळपिकांना हेक्टरी रु.५०,०००/- मदत (पीक विम्या व्यतिरिक्त) १५ दिवसाच्या आत देण्यात यावी.
३) बाधीत कुटुंबांना खावटी अनुदान म्हणुन रु.१०,०००/- तात्काळ देण्यात यावेत.
४) जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पडझड झालेली घरे, रस्ते, पूल ,वीज वितरण व्यवस्था व बंधारे यांच्या दुरुस्तीसाठी आराखडा तयार करून त्यासाठी विशेष निधी उपलब्ध करावा व याची कालबध्द अंमलबजावणी व्हावी यासाठी वरिष्ठ अधिकारी नेमण्यात यावा.
५) मृत्युमुखी पडलेल्या पशुधन मोठी जनावरे/दुधाळ जनावरे यांसाठी रु.५०,०००/- व मेंढी-बकरी यांच्यासाठी रु.१०,०००/- प्रत्येकी मदत देण्यात यावी.
६)झोपडया व गोठ्यांच्या पडझडी बाबत मदत म्हणून रु.५,०००/- प्रति गोठा देण्यात यावे.
७) ज्यांचे घर पाण्यात बुडाले आहे, घर वाहून गेले आहे, किंवा घराचे पूर्णतः नुकसान झाले आहे अशा व्यक्तींना सानुग्रह अनुदान म्हणून रु.१५,०००/- प्रति कुटुंब मदत म्हणून देण्यात यावी.
८)दुकानदार, टपरीधारक, कारागीर/बारा बलुतेदार, छोटे गॅरेज, छोटे उद्योग व्यावसायिक यांना नुकसानीपोटी सरसकट रु.१,००,०००/- पर्यंत आर्थिक मदत देण्यात यावी.
९)ज्या भागात आपत्कालीन परिस्थिती उद्भवलेली आहे अशा भागातील नागरिकांसाठी तात्काळ गहू, तांदूळ व इतर अन्नधान्याचा पुरवठा मोफत स्वरूपात करण्याबाबत प्रशासनाला सूचना द्याव्यात. १५ दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा व्हावी यासाठी प्रशासनाला आपण आदेश द्यावेत व आपले देखील यावर वैयक्तिक लक्ष राहावे, ही आग्रही मागणी. अशा प्रकारचे निवेदन भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी पालकमंत्री शंकरराव गडाख यांना दिले. या प्रसंगी नेताजी पाटील, सुनील काकडे, पिराजी मंजुळे, रामदास कोळगे, ॲड.नितीन भोसले, प्रदिप शिंदे, राजसिंहा राजेनिंबाळकर, संजय पाटील, निहाल काझी, प्रविण सिरसाटे, राजाभाऊ पाटील, राहुल काकडे, रामहरी शिंदे, दत्तात्रय देवळकर, मदन बारकुल, विजय कुमार हौळ, पंडितराव टेकाळे, दत्तात्रय साळुंके, बजरंग शिंदे, अमोल माकोडे, नितीन यादव, शाम यादव, अशोक जाधवर, सचिन कोल्हे, भगवान ओव्हाळ, अनंत देशमुख, अभय इंगळे, प्रविण पाठक, दाजीप्पा पवार, नामदेव नायकल तसेच जिल्हयातील भाजपाचे व युवा मोर्चाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व अतिवृष्टीमुळे बाधीत शेतकरी व नागरीक मोठया संख्येने निवेदन देतांना उपस्थीत होते.
 
Top