Views*प्रा.डॉ.रमेश दापके-देशमुख यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ‘जीवनसाधना’ पुरस्कार, औरंगाबाद येथे भव्य समारंभात सोमवारी होणार पुरस्कार प्रदान*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा श्री कुलस्वामिनी शिक्षण प्रसारक मंडळ, उस्मानाबाद चे संस्थापक-सचिव प्रा.डॉ. रमेश विठ्ठलराव दापके-देशमुख यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादच्या वतीने दिला जाणारा मानाचा ‘जीवनसाधना’ पुरस्कार जाहीर झाला आहे. विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी यांनी पुरस्कार जाहीर झाल्याबाबत पत्राद्वारे डॉ. दापके-देशमुख यांना कळविले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त शैक्षणिक, साहित्य, संशोधन, प्रशासकीय, औद्योगिक, क्रीडा या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणार्‍या व्यक्तींना ‘जीवनसाधना’ पुरस्कार देऊन दरर्षी सन्मानित करण्यात येते. विद्यापीठाच्या 63 व्या वर्धापनदिनी उस्मानाबाद येथील डॉ.रमेश दापके-देशमुख यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. औरंगाबाद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात सोमवार, 23 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड तर अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले हे उपस्थित राहणार आहेत. तसेच विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, प्र.कुलगुरू डॉ. श्याम सिरसाट, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी व विद्यार्थी विकास समितीचे संचालक डॉ. मुस्तजीब खान यांनी दिली आहे. डॉ. रमेश दापके-देशमुख यांचे मराठवाड्यातील शैक्षणिक विकासाच्या चळवळीत मोठे योगदान असून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबादसह विविध संस्थांमध्ये त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उच्च पदावर आहेत. तर अनेकांनी व्यवसाय, उद्योग क्षेत्रात भरारी घेतली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सहसचिव पदाची जबाबदारी संस्थेने सोपविली आहे. या संस्थेचे ते आजीव सदस्य असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अधिष्ठाता पदही मोठ्या जबाबदारीने त्यांनी सांभाळले. विद्यापीठ अधिसभा सदस्यपदी निवडीनंतर त्यांनी प्राध्यापक, कर्मचार्‍यांसह विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांची गुणवत्ता वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावरही त्यांनी काम पाहिलेले आहे. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी ज्ञानदानाचा यज्ञ सुरूच ठेवला. उस्मानाबाद येथे श्री कुलस्वामिनी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना त्यांनी केली. या संस्थेमार्फत इंग्रजी माध्यमातून शिक्षण, काळानुरूप आवश्यक असणारे विज्ञान, तंत्रज्ञान, नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करून शिक्षणाची सोय उस्मानाबादसारख्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केली. या संस्थेच्या शाखांचा विस्तार आता उस्मानाबादसह औरंगाबाद जिल्ह्यातही झाला आहे. शैक्षणिक चळवळीला जीवन समर्पित करणार्‍या व्यक्तीमत्त्वाची ‘जीवनसाधना’ पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल डॉ.रमेश दापके-देशमुख यांचे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे कार्याध्यक्ष डॉ. अभयकुमार साळुंखे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
 
Top