Views


*जिल्हा स्त्री रुग्णालयात स्तनपान सप्ताहाची सुरुवात*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

उस्मानाबाद येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक स्तनपान सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. स्तनपान सप्ताहाच्या उद्घाटन समारंभात मार्गदर्शन करताना या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.स्मिता सरोदे-गवळी यांनी सहा महिन्यापर्यंतच्या बाळाला स्तनपान करणे खूप आवश्यक आहे. स्तनपानाचा उपयोग आई व बाळ या दोघांनाही होतो. स्तनपानामुळे आईचे नैराश्य कमी होते.त्याचबरोबर आईला रक्तदाबाचा त्रास असेल तर तो कमी होतो. बाळाचे विविध आजारापासून संरक्षण होते. त्यामुळे मातांनी स्तनपान करण्यांवर भर द्यावा, असे सांगून डॉ. सरोदे-गवळी म्हणाल्या की, कोरोना संसर्ग झालेल्या आईनेही आपल्या नवजात बाळाला स्तनपान करावे तसेच स्तनपान संपूर्णपणे सुरक्षित असल्याचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग झालेल्या मातांनी मनात शंका न बाळगता नवजात बालकास स्तनपान करावे. कोरोना संसर्ग झालेल्या मातेने स्तनपान करण्यापूर्वी स्वत:चे स्वच्छ हात धूवून घ्यावेत. मुख पट्टीचा वापर करावा. बाळाला स्तनपान देण्यापूर्वी स्तनाच्या आजूबाजूचा भाग निर्जंतूक करावा. कुटुंबातील कोरोना निगेटिव्ह चाचणी असलेल्या व्यक्तीने बाळाचा संभाळ करावा. कुटुंबात असा सदस्य नसल्यास आईने मुख पट्टीचा वापर करुन बाळाबरोबर विशिष्ट अंतर ठेवून राहावे. केवळ स्तनपानासाठीच बाळास जवळ घ्यावे. अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. यावेळी धन्वंतरीचे पूजन व दीप प्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सचिन देशमुख यांनी केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अभय शहापूरकर उपस्थित होते. या कार्यक्रमास डॉ.मुल्ला, डॉ.प्रसाद धर्म, डॉ.स्मिता घोगरे, डॉ.गरड, डॉ. निता पौळ, डॉ.सुर्यवंशी, डॉ. सोनटक्के, डॉ.रामढवे, डॉ. मिटकरी उपस्थित होते. जागतिक स्तनपान सप्ताहा दिनानिमित्त येथील नर्सींग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यातील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रंजना दाने यांनी केले. तर आभार डॉ. संजय सोनटक्के यांनी मानले. या कार्यक्रमास जिल्हा स्त्री रुग्णालयातील डॉ.पाटील, डॉ.टीके, डॉ.बलवंडे, डॉ.बागल, डॉ.मिनियार तसेच सर्व अधिपरिचारिका, कर्मचाऱ्यांसह माता आणि नातेवाईक उपस्थित होते.


 
Top