Views

*उस्मानाबाद जिल्ह्यात अल्प पर्जन्यमान व पावसातील खंड यामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याच्या अनुषंगाने पंचनामे तसेच पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून पिक नुकसानीची भरपाई तातडीने देण्यात यावे*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ ५७.२ टक्केच पाऊस झाला असून जिल्ह्यातील ४२ सर्कल पैकी बहुतांश सर्कलमध्ये १५ ते २० दिवसांचा पावसामध्ये खंड दिसून येत आहे. जिल्ह्यात उशिराने झालेल्या पावसामुळे कांही भागात पेरणी उशिरा झाली होती, त्यात पावसात खंड पडल्यामुळे पिकांचे अधिकच नुकसान झाले आहे. मागील आठवड्यात शेतकऱ्यांकडून घेतलेल्या आढाव्यात असे लक्षात आले आहे कि, सध्या सोयाबीन हे फुल/फळ धारणेच्या स्थितीत असून पावसाने पाठ फिरवल्यामुळे सर्वच ठिकाणी उन्हाने पिके सुकत आहेत. जलस्रोतात पाणी असले तरी भारनियमन, कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने पिकास पाणी द्यायचे कसे हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यातच पिकांवर गोगलगाय व इतर किडीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे सध्यस्थितीत शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये घट झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२० दि. २९/०६/२०२० च्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये उंबरठा उत्पन्नाच्या ५०% पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर हवामानातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करून त्या नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमा धारक शेतकऱ्यांना २५ % मर्यादेपर्यंत आगावू रक्कम देण्याची तरतूद आहे. जिल्ह्यातील ६.६७ लाख शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२१ साठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पीकविमा हप्ता भरला आहे. गेल्या वर्षी अधिकांश शेतकऱ्यांना नुकसान होऊनही पीक विमा न मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या वर्षी विमा भरण्यास उत्सुकता दाखवली नाही. झालेल्या नुकसानीबाबत योजनेतील तरतुदीप्रमाणे शेतकऱ्यांना आगावू रक्कम मिळण्याकरिता आपण जिल्हास्तरीय संयुक्त समितीचे अध्यक्ष या नात्याने अधिसूचना काढून विमा कंपनी व अधिकारी यांच्या संयुक्त पाहणीनुसार विमा कंपनीमार्फत नुकसानीचे प्रमाण व नुकसान भरपाईची रक्कम ठरविणे अपेक्षित आहे. तसेच प्राप्त परिस्थितीमध्ये होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेतीसाठी योग्य दाबाने व सुरळीत वीजपुरवठा करण्याबाबत आपण सूचना देणे अपेक्षित आहे. भारतीय जनता पार्टीचे उस्मानाबाद जिल्हयाचे नेते तथा तुळजापुर विधानसभा सदस्य आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या सुचनेनुसार भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी तालुक्यातील आंबेवाडी, बेंबळी, चिखली, दारफळ, अंबेहोळ, जुनोनी, वलगुड या गावातील शेती पिकांची पाहणी करत झालेल्या नुकसानीचा अंदाज घेत सरकारने तात्काळ नुकसान झालेल्या व होत असलेल्या शेती पिकांचे पंचनामे करावे, अशा प्रकारचे निवेदन भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे देण्यात आले. व त्याचबरोबर सोयाबीन पिकांच्या सुकलेल्या, उन्हाने करपलेल्या आणि शेंगा लागत असतांना पावसाअभावी करपुन जात असलेल्या सोयाबीनच्या रोपांची जुडी सुध्दा निवेदना सोबत जिल्हाधिकारी यांना देण्यात आली. या प्रसंगी नेताजी पाटील, रामदास कोळगे, दत्ता देवळकर, नामदेव नायकल, नाना कदम, बालाजी गावडे, मोहन खापरे, नवनाथ कांबळे, विजय शिंगाडे, तेजस सुरवसे, प्रसाद राजमाने, मार्तंड भोजने, सिध्देश्वर गवळी, गणेश येडके, अमोल पाटील, खंडेराव शिंदे, चोबे दुष्यंत तसेच धाराशिव तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नुकसानग्रस्त शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थीत होते.


 
Top