*मॉडेल इंडिया हंट स्पर्धेत उस्मानाबादचा आरेफअली प्रथम*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
हैद्राबाद येथील ‘दी सिटी हाय लाईफ मॅग्झीन’ या संस्थेच्यावतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त घेण्यात आलेल्या ‘मिस्टर, मिसेस टॉप मॉडेल इंडिया हंट’ स्पर्धेत उस्मानाबाद येथील आरेफअली रफतअली कोतवाल याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. ‘दी सिटी हाय लाईफ मॅग्झीन’ या संस्थेच्यावतीने दरवर्षी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ही स्पर्धा भरवली जाते. या स्पर्धेत देशातील स्पर्धक मोठ्या संख्येने सहभाग नोंदवितात. यातील एका स्पर्धकाच्या कलागुणांना ओळखून त्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी निवड केली जाते. यंदाच्या स्पर्धेत उस्मानाबाद येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील पोलीस निरीक्षक रफतअली कोतवाल यांचा मुलगा आरेफअली याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. या स्पर्धेत परीक्षक म्हणून नामवंत कलाकार कार्तिका शर्मा, टीव्ही कलावंत अविनाश मिश्रा, प्रियांका शर्मा, डॉ.शोभा यांनी काम पाहिले. आरेफअलीने देशपातळीवरील स्पर्धेत उस्मानाबादचा नावलौकिक वाढविल्याने त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.