Views*श्री क्षेत्र तुळजापूरचा केंद्र शासनाच्या प्रशाद (PRASHAD) योजनेमध्ये समावेश करण्यासाठी बैठक बोलवावी - आ. राणाजगजितसिंह पाटील यांची पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे मंदिर ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्र असून देशभरातून लाखों भाविक दरमहा दर्शनासाठी येत असतात. नवरात्र व कोजागिरी पौर्णिमेला येथे मोठे उत्सव व धार्मिक कार्यक्रम असतात. येथे अनेक पुरातन मंदिरे असून इतिहासाची साक्ष देणार्‍या आहेत. त्यामुळे आई जगदंबेच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्री क्षेत्र तुळजापूरचा वैश्विक पर्यटन केंद्र म्हणून विकास करण्यासाठी व या माध्यमातून या भागाच्या अर्थकारणाला चालना देण्यासाठी आई तुळजाभवानी तीर्थक्षेत्राचा केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालय अंतर्गत प्रशाद ((Pilgrimage Rejuvenation And Spiritual, Heritage Augmentation Drive)) योजनेमध्ये समावेश करावा यासाठी केंद्र सरकारला शिफारशीसह विनंती करणे बाबत सर्व संबंधितांची बैठक बोलवावी, अशी मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याचे पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक व पर्यटन स्थळांचा गौरवशाली वारसा लाभलेला आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी व आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी पर्यटनाच्या माध्यमातून या भागाचा विकास केल्यास येथील अर्थकारणाला मोठी चालना मिळू शकते. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी भाविकांची सोय करण्यासाठी तसेच या भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी श्री क्षेत्र तुळजापूर रेल्वे मार्गाने जोडण्याची घोषणा केली होती व आज हे काम सुरू देखील झालेले आहे. त्याचप्रमाणे गृह मंत्री ना. अमितजी शाह यांनी देखील तुळजापूरला वैश्विक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा मानस व्यक्त केला आहे. पर्यटन क्षेत्राच्या विकासकारिता केंद्र शासनाने प्रशाद (PRASHAD) नावाची मिशन मोड वरील तीर्थक्षेत्र विकासासाठीची योजना जाहीर केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून पर्यटक वाढीसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती, रोजगार निर्मिती, पर्यटन क्षेत्रबाबाबत जागरूकता वाढविणे, कौशल्य विकास, पर्यटन वाढविण्यासाठी क्षमता निर्माण करणे, पर्यटकांना मूल्यवर्धित सेवा पुरविणे, पर्यटन स्थळांमध्ये खासगी क्षेत्राचा सहभाग वाढविणे व एकात्मिक विकास आराखड्याच्या माध्यमातून परिसर विकसित करणे या बाबी अंतर्भूत केल्या आहेत. या योजनेला संपूर्णत: केंद्र शासनाचे अर्थसहाय्य असून योजनेत समाविष्ट करण्यासाठी राज्य सरकारची शिफारशीसह विनंती आवश्यक आहे.
श्री क्षेत्र तुळजापूरचा या योजने मध्ये समावेश केल्यास या भागात मोठी गुंतवणूक वाढेल व औद्योगिकीकरणाचा अभाव असलेल्या या जिल्ह्यात मोठी आर्थिक क्रांती घडणार आहे. त्यामुळे केंद्र शासन, राज्य शासन व CSR च्या माध्यमातून जिल्ह्यातील ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक व पर्यटन स्थळांचा विकास केल्यास जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक व दरडोई उत्पन्नात मोठी भर पडू शकते. केंद्र सरकार देखील याबाबत सकारात्मक आहे.  
त्यामुळे आई तुळजाभवानी तीर्थक्षेत्राचा प्रशाद (PRASHAD) योजनेमध्ये समावेश करण्यासाठी केंद्र सरकारला शिफारशीसह विनंती करणे बाबत सर्व संबंधितांची बैठक बोलवावी, अशी मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याचे पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी व महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दलची शिवसेना व विशेष करून ठाकरे कुटुंबियांची श्रध्दा, प्रेम, सर्वश्रृत आहे. त्यामुळे या विषयात ना. आदित्य ठाकरे व्यक्तिशः लक्ष घालून लवकरात लवकर बैठक बोलावतील ही अपेक्षा व्यक्त केली आहे.
 
Top