*कळंबकरांना यंदाही नाही संताच्या पालखीच्या सहवासाचा लाभ*
कळंब, (प्रतिनिधी)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याही वर्षी सरकारने पायी वारी रद्द केली आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे पायी वारी करणारे लाखो वारकरी नाइलाजास्तव घरातच बसून आहेत. मात्र, प्रत्येक वारकऱ्यांची मनाची वारी निश्चित सुरू असणार. हे सारे वैष्णवजण जुन्या आठवणींवर वारीची 'मानसिक साधना' पूर्ण करतील, यात शंका नाही.
आषाढ महिना आला की कळंब कराना वेध लागतात ते आषाढ वारीत येणाऱ्या वारकऱ्यांची अन्नदान करून सेवा करायची. विदर्भातून पंढरपूरकडे जाणाऱ्या दरवर्षीच्या पालख्या कळंब शहरात मुक्कामी राहत असत, शेकडो पालख्या संतांच्या संगतीत पंढरीची वारी करीत असल्याने शहरातून कित्येक जन वारकऱ्यांसाठी मुक्काम व जेवण्याची सेवा करीत असतात, हा नेमधर्म पारंपरिकता पाळतात.
प्रत्येक दिंड्याचा कळंब शहरात वेगवेगळ्या दिवशी मुक्काम असतो, मुक्कमनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अल्पोपहार व चहापान घेऊन दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात.
या मार्गावरून जाणारी सर्वात मोठी पालखी म्हणजे शेगाव येथील गजानन महाराज यांची दिंडी होय. सजविलेला गजानन महाराज यांचा रथ दिमाखात उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करतेवेळी विविध स्तरावरून भाविक भक्त पालखीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी उभे असतात. फुलांनी सजविलेली पालखीत पादुका विराजमान असतात.
पंचक्रोशीतील भाविक गजानन महाराज यांच्या पदुकाचे दर्शन घेण्यासाठी रांग लावत असतात. तर पालखी सोबत खेळणी, खाऊ असे नानाविध दुकाने थाटली जात असत. दर्षणासोबत खरेदीचा ही आनंद कलंबकर घेत असतात.
दुसऱ्या दिवशी पालखी दिंडी पहाटेच ढोकी मार्गे मार्गस्थ होत असे
परंतु यंदा कोरोनामुळे गेल्या वर्षी सारे जग थांबले होते. त्याला पायी वारीही अपवाद राहिली नाही. यंदाही कोरोनाचा प्रभाव असल्याने मागीलवर्षीप्रमाणेच पायी वारी रद्द करण्यात आली. भक्तांच्या महापुराने भरून वाहणारा नवीन झालेला सिमेंट रस्ता सुध्दा सुनासुना वाटत आहे. वारीमध्ये पंढरपूर रस्ता हा वारकऱ्यांनी भरून जाणाऱ्या रस्त्यावर दैनंदिन वाहनांचीच गर्दी दिसून येत आहे. शेकडो वारकऱ्यांसमवेत या विदर्भातील अनेक संतांच्या पालख्या सोहळ्याचे सोहळे आल्यानंतर संप्रदायाचे दिसणारे ऐश्वर्य डोळ्याचे पारणे फेडणारे असते मात्र कोरोनामुळे या संतांच्या आध्यात्मिक सहवासाला कळंबकर सलग दुसऱ्या वर्षी मुकले आहेत.
आमच्याकडे येणाऱ्या दिंडीमधील सर्व वारकऱ्यांना अन्नदान करण्याची सत्तर वर्षापासून ची आमची परंपरा आहे परंतु गतवर्षी पासून आम्हाला हे सुनेसुने वाटत आहे.
दिंडी प्रमुखांनी मला प्रत्यक्ष भेटून दिलगिरी व्यक्त केली, तरीपण आम्ही या कोरोनाच्या काळात राहून गेलेल्या अन्नदान ऐवजी संबंधित संस्थांना देणगी पाठवून दिली आहे. कोरोनाचे संकट लवकर दूर होऊन पुन्हा वारकऱ्यांचा हा सोहळा पूर्ववत सुरू होवो, ही प्रार्थना.
- बंडोपंत नरहरराव दशरथ, कळंब