Views



*खरीप २०२० पीक विम्या साठी कृषी सहाय्यका कडे अर्ज करावेत - आ.राणाजगजितसिंह पाटील*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

खरीप २०२० मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीने सोयाबीनचे प्रचंड नुकसान होऊन देखील ८०% शेतकरी हक्काच्या पीक विम्यापासून वंचित आहेत. राज्य सरकारने नुकसान झाल्याचे मान्य करत अनुदान दिले, परंतु विमा भरपाईबाबाबत मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रयत्न करून देखील उर्वरित शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. आता न्यायालयीन लढाईचा एक भाग म्हणून अनुदान मिळालेल्या परंतु विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित कृषी सहाय्यकाकडे मागणी अर्ज देऊन रीतसर पोहच घ्यावी असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. सदर नुकसानीच्या अनुषंगाने सन २०१९ मध्ये फडणविस सरकारने जशी सरसकट नुकसान भरपाई दिली त्याप्रमाणे सरसकट नुकसान भरपाई दिली जाईल, अशी चर्चा असल्याने शेतकऱ्यांनी तेव्हा नुकसान भरपाईचा वेगळा अर्ज केला नव्हता, परंतू शासकीय यंत्रणेला नुकसान झाल्याचे कळविले होते व प्रत्येक गावात शासकीय यंत्रणेणे जाऊन पाहणी देखील केली होती. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनुदान देण्यात आले, याचा अर्थ या सर्व शेतकऱ्यांच्या पिकाचे ३३% पेक्षा जास्त नुकसान झाले आहे हे राज्य सरकारने मान्य केले आहे. प्रधानमंत्री फसल बीमा योजनेची प्रक्रिया राज्य सरकारच्या कृषी आयुक्तांच्या माध्यमातून होते. निविदा काढुन विमा कंपनी ठरविणे व करार करण्याची जबाबदारी ही कृषी आयुक्तांची आहे. म्हणजे पीक विम्याच्या प्रक्रियेत राज्य सरकारची जबाबदारी सुनिश्चित आहे. पिक विम्याच्या नुकसान भरपाई बाबत चौकशी केली असता ७२ तासात लेखी अर्ज न केल्यामुळे विमा दिला नाही असे सांगण्यात आले होते. कृषी आयुक्त व विमा कंपनीकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर २६ नोव्हेंबर पर्यंतच्या सर्व प्राप्त तक्रारी ग्राह्य धरल्या असून त्यांना विमा वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकीकडे राज्य सरकारने ३३% नुकसान झाल्याचे मान्य करुन ४,५७,२१६ शेतकऱ्यांना कमी का असेना अनुदान दिले आहे. परंतू विमा भरपाई केवळ ७५,६३२ शेतकऱ्यांना मिळाली आहे. उर्वरित ३,८१,५८४ शेतकऱ्यांना न्याय देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, परंतु मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन देखील सण २०१९ प्रमाणे सरसकट नुकसान भरपाई दिली जात नसल्यामुळे आता न्यायालयीन लढाईचा एक भाग म्हणून अनुदान मिळालेल्या परंतु विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित कृषी सहाय्यकाकडे मागणी अर्ज देऊन रीतसर पोहच घ्यावी, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. अर्जात पीक विमा हप्ता भरल्याची माहिती, संरक्षित पिकाचे क्षेत्र लिहिणे अपेक्षित आहे. समाजमाध्यमातून व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमार्फत गावोगावी नमुना अर्ज उपलब्ध करून दिला जाणार आहे.

 
Top