*शालेय परिसर प्रेरणादायी असावा - मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचा परिसर हा विद्यार्थी, पालक व अभ्यागतांना प्रेरणा देणारा असावा असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी शालेय भेटीत शिक्षकांशी चर्चा करतांना म्हटले. जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या प्रामुख्याने ग्रामीण भागात असल्याने या शाळामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी येत असल्याने त्याला आणि त्याच्या पालकांना या शाळा शहरातील खाजगी शाळांपेक्षाही सुंदर व आकर्षक आहेत असे वाटले पाहिजे. त्याचबरोबर शाळेच्या प्रत्येक अंगातून काहीतरी चांगली प्रेरणा मिळते आहे असेही जाणवले पाहिजे. यासाठी शिकवण्याच्या कौशल्या बरोबरच शालेय परिसर सुंदर,आकर्षक,वृक्षांकीत केला पाहिजे. शिक्षकांनी मनावर घेतले तर हे कार्य काही अवघड नाही. कारण जिल्ह्यातील अनेक शाळा ह्या गुरुजनांच्या पुढाकारातून अत्यंत सुरेख झालेल्या आहेत.त्यामुळे ज्या शाळांची अद्याप रंगरंगोटी झालेली नाही, कमी प्रमाणात वृक्ष लावलेले आहेत,अस्वच्छता आहे,सुरेख बगीचा नाही. त्या शाळांच्या शिक्षकांनी पुढाकार घेऊन शाळा सुंदर कराव्यात. ही सुंदरता आतून-बाहेरून असावी. फड यांनी उस्मानाबाद तालुक्यातील काही शाळांना सहज भेटी देऊन तेथील शिक्षकांशी या विषयाच्या अनुषंगाने चर्चा केली. यावेळी उपस्थित शिक्षकांनी आम्ही आमची शाळा अत्यंत सुरेख करून दाखवू असे आश्वासन दिले. शाळा ही सुजाण नागरिक निर्माण करण्याचा आधारस्तंभ असल्याने व पालकांची खरी संपत्ती ही मुले असल्याने गुरुजनांनी त्यांचे कर्तव्य चौफेरपणे पार पाडणे आवश्यक असल्याची अपेक्षा फड यांनी व्यक्त केली.यावेळी फड यांचे सोबत जिल्हा परिषदेतील काही अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.फड यांनी शिक्षका सोबतच काही नागरिकांशीही विविध विषयावर चर्चा केली.