Views






*काजळा येथे शेतरस्ता मोहिमेस वेग; आठ कामे पूर्ण, मातीकामासह मजबुतीकरणाने रूपडे पालटले!
सारोळा पॅटर्नची घेतली प्रेरणा!आतापर्यंत १० किमीचे रस्ते तयार!शासनाचा एक रूपयाचाही निधी न घेता लोकवर्गणीतून कामे! मातीकामासह मुरूम टाकून रस्त्याचे मजबुतीकरण!*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 शेतरस्त्याचा सारोळा पॅटर्न यशस्वी झाला असून काजळा (ता. उस्मानाबाद) येथे शेतरस्ता मोहिमेस मोठा वेग आला आहे. गत काही दिवसात काजळा शिवारात तब्बल आठ रस्त्याची कामे पूर्ण झाली असून मातीकामासह मजबुतीकरणही करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी स्वखर्चातून रस्त्याची कामे केली आहेत. रस्त्याअभावी होणारी गैरसोय आता कायमची मिटली असून शेतरस्त्याचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी मनावर घेतले तर काय होवू शकते, याचा प्रत्यय काजळ्यात येत आहे. शेतरस्ता म्हटले की, वाद-विवाद, तंटेच नव्हे तर हाणामाऱ्यापर्यंत प्रकरण पोहचते. त्यानंतर मग पोलीस स्टेशन आणि कोर्टाच्या पायऱ्या चढण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. मग 'तारीख पे तारीख' चा सिलसिला सुरू होते. प्रशासनाच्या 'कागदी' मेळात शेतरस्त्याची प्रकरणे अडकली जातात. शेतात बैलगाडी, ट्रॅक्टर, ऊसाची वाहने तर सोडाच पण धड पायवाटही राहत नसल्याने वर्षेनुवर्षे शेतकऱ्यांची गैरसोय सुरू आहे. सारोळा (बुद्रूक ता. उस्मानाबाद) येथे सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी शेतकऱ्यांना सोबत घेवून शिवारातील शेतरस्ते करण्याची मोहिम हाती घेतली. बघता-बघता आठ रस्त्याची कामे पूर्ण झाली असून यासाठी शेतकऱ्यांनी शासनाचा एक रूपयाचाही निधी न घेता लोकवर्गणीतून कामे केली आहेत. शेतशिवारात नवीन शेतरस्ते निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची मोठी सोय झाली आहे. त्यानंतर शेतरस्त्याचा नवा सारोळा पॅटर्न उदयास आला. याच पॅटर्नची प्रेरणा घेवून काजळा गावातील शेतकऱ्यांनीही शेतरस्त्याची मोहिम हाती घेतली. बघता-बघता आतापर्यंत तब्बल ८ रस्त्याचे मातीकामच नव्हे तर मजबुतीकरणही पूर्ण केले आहे. जवळपास १० किमीपेक्षाही अधिक लांबीचे हे रस्ते साकारण्यात आले आहेत. तब्बल १५ ते १७ फुट रूंदीचे हे रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी पाऊल वाटही नव्हती, त्याठिकाणी आता मोठ-मोठाले रस्ते झाले असून मातीकामासह मजबुतीकरणाने रस्त्याचे रूपडे पालटले आहे. आता शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पक्के रस्ते तयार झाल्याने पिढ्यान्पिढ्या शेतकऱ्यांची होणारे हाल आता थांबणार आहेत.
......................................
शेतरस्त्यांसाठी विशेष निधी द्या
शेतरस्त्याचा सारोळा पॅटर्न यशस्वी झाला असून परिसरातील गावातही हा पॅटर्न राबविला जात आहे. केवळ तीन गावात १८ शेतरस्त्याची कामे पूर्ण झाली आहेत. ज्या गावात कामे सुरू आहेत, त्याठिकाणी जावून शेतकऱ्यांशी चर्चा केली जात आहे. शेतकऱ्यांचा सहभाग आणि लोकवर्गणीमुळेच कामे पूर्ण होत आहेत. मात्र आता शासनाने या रस्त्यासाठी विशेष निधी देवून मजबुतीकरणासह खडीकरण करण्याची गरज आहे.
(विनोद बाकले, ग्रामपंचायत सदस्य सारोळा)
.....................................
शेतकऱ्यांना सहकार्य करणार
शेतरस्त्याचा सारोळा पॅटर्न काजळा शिवारात राबविण्यात येत आहे. काही ठिकाणी रस्ते करण्यासाठी अडचणी येतात. मात्र त्याठिकाणी जावून शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्यात येत आहे. तसेच पोकलेन, ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या लोकवर्गणीतून ही कामे होत आहेत. यापुढेही शेतकऱ्यांना शेतरस्ता करण्यासाठी सहकार्य करणार येणार आहे.
(प्रविण पाटील, सरपंच काजळा)
..................................
रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला
आमच्या शेताकडे जाण्यासाठी रस्ताच नव्हता. त्यामुळे आम्हाला उन्हाळ्यामध्येच खते, बि-बियाणे नेवून शेतात ठेवावे लागत होते. तसेच पावसाळ्यात शेतात जाणेही मुश्किल व्हायचे. त्यामुळे शेतरस्त्याचा सारोळा पॅटर्न राबविण्याचे ठरविले आणि याची प्रेरणा घेवून आम्हीही शेतरस्ता तयार केला. त्यामुळे आता रस्त्यामुळे आमची अडचण दूर झाली असून पावसाळ्यातही मोठी वाहने शेतात जाणार आहेत.
(संतोष लोमटे, काजळा)
 
Top