Views


*गरीब घटकांसाठी केलेली मदत मोलाची असते -- शेषाद्री डांगे, वृंदावन व स्फूर्ती फाउंडेशनच्यावतीने सायकलचे वाटप*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 सरकारी यंत्रणा जेंव्हा अपुरी पडते तेंव्हा सामाजिक संस्थांनी पुढे येऊन तळागाळातील लोकांना मदत केली पाहिजे सामाजिक भावनेने केलेली मदत ही गोरगरिबांसाठी खूप मोलाची असते असे मत जेष्ठ विचारवंत शेषाद्री डांगे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त डिकसळ येथे गरजुवंत विद्यार्थ्यांना सायकल व टॅब वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी केले. वृंदावन फाउंडेशन पुणे व स्फूर्ती फाउंडेशन कळंब यांच्या वतीने डिकसळ येथिल श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थानमध्ये गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी सायकल व शैक्षणिक टॅब वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ विचारवंत शेषाद्री डांगे, संस्थानचे उत्तराधिकारी परमेश्वर महाराज बोधले, स्फूर्ती फाउंडेशनचे सचिव मकरंद पाटील, प्रा.विजय घोळवे, उद्योजिका पौर्णिमा मोहिते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना स्फूर्ती फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी गिड्डे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे‌. याच गुणवंत विद्यार्थ्यांना शोधून त्यांची मदत करण्याचे उद्दिष्ट आमच्या संस्थेचे आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू केलेली मदत अधिक अधिक विद्यार्थ्यांना करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. तसेच गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले म्हणाले की गडकरी हे रोडकरी तर आहेतच पण ते फडकरी आणि वारकरी यांच्या पाठशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व आहे. देशातील धार्मिक स्थळांना जसे त्यानी रस्त्यांनी जोडलं आहे तसेच त्यांनी आपल्या विचारातून कायम गरीब घटकाला मदत करण्याचे काम केलं आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या गरीब विद्यार्थ्यांसाठी जो शैक्षणिक हातभार लावला आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तो शिकणाऱ्यांना प्रेरणा देणार आहे. यावेळी डिकसळ येथिल समृद्धी ज्ञानोबा अंबिरकर व वैष्णवी परमेश्वर अंबिरकर या दोन विद्यार्थिनीना सायकलचे वाटप करण्यात आले. तर वैष्णवी अंबिरकर हिचा इयत्ता 10 वी ते 12 वि पर्यंतचा सगळा शैक्षणिक खर्च प्रा.विजय घोळवे करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन क्षीरसागर यांनी केले तर आभार दीपक ताटे यांनी मानले.
 
Top