Views




*बेंबळीच्या दोन सुपुत्रांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर धनाजी, अविनाश यांची भरारी, राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी गावचे सुपुत्र असणारे व महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावर कर्तव्य बजावत असलेल्या बेंबळीचे २ कर्तव्यदक्ष तरुण धनाजी विष्णू खापरे पाटील व अविनाश अशोक नळेगावकर यांना पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे दिले जाणारे यावर्षीचे मानाचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. त्याबद्दल या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तव्यादरम्यान उत्तम, उल्लेखनीय व प्रशंसनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी,अंमलदारांना पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यातर्फे प्रतिवर्षी पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह जाहीर केले जाते.सन २०२० यावर्षातील महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह शुक्रवारी सायंकाळी जाहीर झाले. त्यात बेंबळीचे सुपुत्र असलेले व सोलापूर जिल्ह्यात मोहोळ पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत असलेले पोलीस उपनिरीक्षक श्री रविराज उर्फ धनाजी विष्णू खापरे पाटील व गडचिरोली येथे कर्तव्य बजावत असलेले पोलीस उपनिरीक्षक श्री अविनाश अशोक नळेगावकर यांना दरोडेखोर/गुन्हेगारांच्या टोळ्यांविरोधात केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह जाहीर झाले. या तरुणांच्या सन्मानामुळे बेंबळीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.त्याबद्दल सर्व थरांतून व सोशल नेटवर्किंग साईडच्या माध्यमातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.
दोघांचा प्रवास प्रेरणादायी
 धनाजी खापरे पाटील व अविनाश नळेगावकर या दोघांचा जीवन प्रवास आजच्या युवकांसाठी मोठा प्रेरणादायी आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दोघांनीही पोलीस उपनिरीक्षक पद कुशाग्र बुद्धिमत्ता व प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावर प्राप्त केले होते. आपली निवड सार्थ असल्याचे दाखवत त्यांनी पोलीस दादा ला शोभेल अशी उत्तुंग कामगिरी केली आहे. गडचिरोली या नक्षलवाद्यांनी घेरलेल्या जिल्ह्यामध्ये यशस्वीपणे कामगिरी करत आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे. अनेक वेळा नक्षलवाद्यांशी चार हात करत आपले कर्तव्य बजावले आहे.
 
Top